सासरी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अवघ्या महिन्याभरात नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ माजवली असतानाच. दीपा पुजारी आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा हुंडा व सासरच्या छळाच्या विरोधातली परिस्थिती उजेडात आणली असून, राज्यातल्या महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना आणि महिलांच्या सुरक्षिततेचा व न्यायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दीपा पुजारी हिने सासरी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अवघ्या महिन्याभरात नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. दीपा ऊर्फ देवकी प्रसाद पुजारी अवघ्या 22 व्या वर्षी 19 मे 2025 ला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिचा विवाह महिन्याभरापूर्वी 18 एप्रिल रोजी प्रसाद चंद्रकांत पुजारी याच्याशी झाला होता.
दीपाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी पती प्रसाद पुजारी, दीर प्रसन्ना पुजारी, सासू सुरेखा पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी (सर्व रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, विवाह प्रसंगी दीपाच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून चार तोळे सोने दिले व सुमारे १० लाख रुपयांचा खर्च केला. तरीही नववधूला मनासारखा हुंडा व मानपान मिळाला नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. विशेषतः भांडीकुंडी, फ्रीज व इतर वस्तू न दिल्याचा राग ठेवून दीपाला शिवीगाळ, अपमान आणि छळ सहन करावा लागत होता.
या मानसिक त्रासामुळे निराश झालेल्या दीपाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. हडपसर पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू केली आहे.