Pune Crime News
Pune Crime News sarkarnama
पुणे

Pune Crime : पठ्ठ्याने सीएलाच मागितली ३० लाखांची खंडणी

सरकारनामा ब्यूरो

Pune Crime News : सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामध्ये अनेक उच्च शिक्षितही या जाळ्यात अडकले असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.

एका सुशिक्षित तरुणानेच खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील माहितीचा वापर करून एका सुशिक्षित तरुणाने सनदी लेखापालाला ३० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुकुंदनगर येथील ५२ वर्षीय सनदी लेखापाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी किरण रामदास बिरादार (वय २४, रा. मांजरी, आवडकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर) या संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार हा बीएस्सी पदवीधर आहे. तो फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरुन व्यावसायिकांची माहिती घेऊन त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याकडे खंडणी मागतो. फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा कोलकता येथे शिक्षण घेत असल्याची माहिती फेसबुकवर पोस्ट केली होती.

ही माहिती घेऊन आरोपी बिरादार याने सनदी लेखापालाला व्हॉटसअप कॉल करत ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास कोलकता येथे मुलाला ठार करीन, अशा धमकीचे मेसेज पाठविले. फिर्यादी यांनी ही बाब खंडणी विरोधी पथकाला दिली.

त्यावर पोलिसांनी फिर्यादीला बनावट नोटांची बॅग स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकाजवळ आणि नंतर डेक्कन येथील गरवारे पुलाखालील झुडपात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी गुरुवारी सकाळी आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी बॅग ठेवली.

त्यावेळी पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी बॅग घेण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीने यापूर्वी आणखी कोणाकडून खंडणी घेतली आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT