Rupee Bank sarkarnama
पुणे

दिलासादायक : 'रुपी'त अडकलेले ९६५ कोटी ठेवीदारांना मिळणार

पाच लाखांपर्यंतच्या ठेवी ३० नोव्हेंबरपर्यंत परत मिळणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : केंद्र सरकारच्या सुधारित ठेव विमा कायद्यामुळे रुपी को-ऑप बँकेत (Rupee Bank) अडकलेल्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी आता परत मिळणार आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) अशा चार लाख ९६ हजार ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. त्यांचे ९६५ कोटी रुपये परत मिळणार आहेत. परिणामी 'रुपी'च्या ठेवीदारांना अखेर न्याय मिळाला; पण, लढाई अद्याप बाकीच आहे. कारण पाच लाखांपर्यंतच्या ठेवीच मिळणार असून त्यापुढील रकमेच्याही त्या मिळाव्यात, अशी मागणी आता पुढे आली आहे. (Depositors of Rupee Bank will get relief up to Rs 5 lakh)

पाच लाखांपर्यंतच्या ठेवी ३० नोव्हेंबरपर्यंत परत मिळणार आहेत. मात्र, पाच लखांपुढील ठेवीदारांना हा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे रुपीच्या ठेवीदारांचा लढा अद्याप संपलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामार्फत मागणी केली होती. विधीमंडळ अधिवेशनात सरकारचे लक्ष त्याकडे त्यांनी वेधले होते. हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याव्दारे त्यांनी रुपी बँकचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. त्यावेळी रुपी बँकचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले होते, असे ते म्हणाले.

रुपीचे बहुतांश ठेवीदार हे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातीलच आहेत. त्यांच्या या बॅंकेत १ हजार २९७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पाच लाखांपर्यंत ठेवीदारांची संख्या तब्बल ४ लाख ९६ हजार इतकी आहे. त्यांच्या ९६५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादण्यात आलेल्या बँकांच्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी सुधारित ठेव विमा कायदा पारित केला आहे. त्याचा रुपी बॅंकेच्या ४ लाख ९६ हजार ठेवीदारांना त्याचा फायदा होणार आहे. ठेव विमा महामंडळामार्फत (डीआयसीजीसी) ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील रहिवाशांच्या सुमारे १४०० कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत.

रुपीच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळवण्यासाठी बँकेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी संबंधित शाखेत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जासोबत रहिवाशी पुरावा, दोन छायाचित्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड दोन प्रतींमध्ये ठेवीदारांना द्यायचा आहे. बँकेने केवायसीसह अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे संबंधित ठेवीदारांनी तात्काळ बँकेच्या शाखांमध्ये पाठपुरावा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT