DCM Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

DCM Ajit Pawar: अजितदादा...तुम्हीसुद्धा...! आधी 'चहापाना'च्या खर्चावरून मुख्यमंत्री शिंदेंना घेरले, आता दीड कोटी मंजूर

Chaitanya Machale

Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावरील चार महिन्यांचे चहापानाचे बिल तब्बल दोन कोटी 38 लाख रुपये आले, असे गेल्या वर्षी समोर आले होते. त्यावेळी 'सरकार या चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का?' असा कडवट सवाल त्यावेळचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी विचारला होता. मात्र, आता तेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांना हाच चहा आता गोड वाटू लागलेला दिसतोय, अशी टीका 'आप'चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

मागील वर्षी माहितीच्या अधिकारात मुख्यमंत्री निवासस्थानी चहावर होत असलेल्या खर्चाची माहिती समोर आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा कडक शब्दांत समाचार घेत टीकास्त्र सोडले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विकासकामांपेक्षा सरकारी उधळपट्टी वाढली आहे आणि तो खर्च कमी करण्यासाठी नोकर भरतीऐवजी कंत्राटी भरती करावी, तसेच इतरही उपाय अवलंब व्हावे, असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी दिला होता. परंतु आता याच अजित पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या चहापानाच्या खर्चासाठी चक्क दीड कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.

या संदर्भातील आदेश 3 जानेवारी 2024 ला काढण्यात आला आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने एप्रिल 2023 पासून दोन वर्षांसाठी लागू करण्याचा पराक्रमदेखील करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षात होते. त्यावेळी त्यांनी अशा उधळपट्टीवरती खरपूस टीका केली होती. मात्र, आता स्वतःच उपमुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांच्या स्वतःच्या बंगल्यावर चहापाण्यासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे सत्तेत आल्यावर 'सोन्याचा अर्क घातलेला चहासुद्धा अजितदादांना गोड लागू लागला आहे का ?' असा प्रश्न मुकुंद किर्दत यांनी विचारला आहे. जनतेच्या पैशातून केल्या जाणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT