Fadanvis and Andhare  Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sushma Andhare tweet : ललित पाटील प्रकरण, मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावरही बोलले आहेत ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Pune News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांचा एक व्हिडिओ ट्विट करून त्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य करत, काही प्रश्न विचारले आहेत. ज्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून, सूचक इशाराही दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''ललित पाटील केसच्या संदर्भातील गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या आहेत आणि कोणी संरक्षण दिलं हेदेखील स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात आता खरं म्हणजे त्यांना बोलायलाच जागा नाही, पण त्यांनीच काय कोणीही एखादी तक्रार केली असेल, एखादा व्हिडिओ ट्विट केला असेल, तर सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल.''

याशिवाय ललित पाटील प्रकरणी अनेकांची तोंड बंद होतील, असं तुम्ही या अगोदर विधान केलं होतं. सध्या त्याबाबत काही परिस्थिती आहे? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ''तोंड तर बंद झालीच आहेत, उरलेलीही लवकरच होतील. थोडी अजून वाट पाहा, शेवटी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची खोलवर पाळंमुळं आहेत. त्यामुळे वरवरची कारवाई करून यामध्ये फायदा होणार नाही. मूळ याचे कोण सूत्रधार आहेत, जे अशाप्रकारचं रॅकेट चालवतात. तेदेखील शोधून काढण्याची आवश्यकता आहे, त्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे ते सापडतील.''

मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय? -

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्यापही तसाच आहे, जरांगेंना दिलेला अल्टिमेटम नेमका किती तारखेचा आहे, यावरही अजून घोळ पाहायला मिळतोय. नेमकं हे सगळं प्रकरण कधीपर्यंत मिटेल? यावर उत्तर देताना फडणीसांनी सांगितले की, ''मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार बांधील आहे आणि तीच आमची भूमिका आहे. त्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही करतो आहोत, ती सुरू केलेली आहे. त्याला जो काही कायदेशीर वेळ द्यावा लागेल, तो कायदेशीर वेळ आम्ही देऊ.''

याचबरोबर ''त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजालाही सांगितलेलं आहे, की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त शेवटी राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न काय असणार आहे, तर प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेही दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत, अशाप्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही. हा प्रयत्न आम्हाला करावा लागेल.

मला असं वाटतं की ही केवळ आमचीच जबाबदारी आहे, असं नाही. महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे. प्रत्येक नेत्याची मग ते समाजाचे नेते असो किंवा राजकीय नेते असतील. ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही. अशाप्रकारे विधान केले जातील किंवा आपलं वर्तन कसं राहू शकेल हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे,'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षणप्रश्नी माहिती दिली.

सुषमा अंधारेंनी ट्विटमध्ये काय म्हटलं? -

''उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगूज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ : पुणे जेल रोड.'' असं म्हणत सुषमा अंधारेंनी ट्विटसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिस आरोपींना घेऊन जात असताना, त्यांची व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसते. याशिवाय व्हॅनच्या बाजूला खाली पोलिस आणि एक-दोन तरुणांमध्ये काहीतरी देवाण-घेवाण झाल्याचेही दिसते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT