मुंबई : ठाकरे सरकार (Thackeray Government) सत्तेत आल्यानंतर पोलिस बदल्यांमध्ये मोठी देवघेव झाल्याचा अहवाल गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla Phone Taping) यांनी दिला होता. यावर सरकारने कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप करत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अहवालातील काही बाबी माध्यमांसमोर आणल्या होत्या. मात्र यावरुन गोपनीयतेचा भंग आणि टेलग्रॅफिक अॅक्टनुसार मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली आहे.
१३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता फडणवीस यांना चौकशीसाठी बीकेसीमधील सायबर पोलिस स्थानकात बोलवण्यात आले. त्यावरुन त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपण चौकशीला जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना सांगितले, तुम्ही पोलिस स्टेशनला येवू नका, आम्हीच तुमच्या घरी येतो. त्यावर मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात, असे त्यांनी जाहीर केले.
मात्र देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या या नोटिसीवरुन उद्विग्न होत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वच राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. आज अजित पवार पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे तब्बल ३१ कार्यक्रम आहेत. या दरम्यान सकाळी सुस भागात भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने त्यांना फडणविसांच्या नोटिसीबद्दल आणि भाजपच्या आंदोलनाबाबत विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र माझं एवढचं म्हणणं आहे की, सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावं. आपल्या देशात आणि राज्यात अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. नोटिसा देणे, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणे.
मी देशाच्या पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केले आहे. प्रत्येकाने आपले काम करावे. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावे. राज्याचे पहिले दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने कसे वागले पाहिजे, हे दाखवून दिले आहे. लोकांना एकमेकांच्यावरचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. पुण्यात सूसमध्ये मी आज आलोय. इथल्या लोकांचं म्हणणंय आमचा पाण्याच, ड्रेनेजचा, विजेचा, स्मशानभूमीचा प्रश्न सुटावा. पण तो प्रश्न राहातो बाजूला. प्रत्येक वेळी कोणी काहीतरी वक्तव्य करते. नोटिसा काढल्या जातात. माध्यमे देखील ही मते दाखवतात. कृपा करून सगळ्यांनी वेळ घालवू नका. सर्वांनी मिळून हे बंद केले पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.