Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Mahayuti Politics : 'हरलो अन् जिंकलो तरी सत्ता आपलीच...', 'मविआ'ला चितपट करण्यासाठी अजितदादा-फडणवीसांनी रचलाय 'हा' मास्टर प्लॅन!

NCP BJP Strategy : मागील महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी १६२ पैकी बहुतांश जागांवर एकमेकांसमोर उमेदवार उभे केले होते. त्यातल्या ८५ जागांवर थेट आणि चुरशीची स्पर्धा झाली, ज्यात भाजपने ५० जागा तर राष्ट्रवादीने ३५ जागा जिंकल्या होत्या. सध्याची प्रभाग रचना ही नव्याने तयार करण्यात आली असली तरी ती जुन्या प्रभाग रचनेप्रमाणेच आहे.

Sudesh Mitkar

Pune Newe, 16 Dec : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बहुतांश ठिकाणी युतीमध्ये निवडणुका लढणार आहे. मात्र याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र महायुतीमध्ये जागा नसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर अनेक जण अवाक झाले असले तरी यामागे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वेगळीच रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. पुणे महानगरपालिकेचा विचार केलास तर 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने होती. यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये 85 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये काटेकी टक्कर झाली. यातील 50 जागा भाजपने तर उर्वरित 35 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या.

या पालिका निवडणुकीमध्ये जर महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रित निवडणूक लढली तर यासारख्या 85 जागांवरती दोन्ही पक्षातील मिळून एकच उमेदवार निवडणूक रिंगणात येईल. त्यामुळे आपसूकच महायुतीतील एखादा स्ट्रॉंग उमेदवार महाविकास आघाडीला आयता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा जागांवर भाजप विरुद्ध 'राष्ट्रवादी'ची अशी लढत झाली तरी शक्यतो विजय हा 'महायुती'चाच व्हावा, अशी रणनीती आखण्यात आली आहे.

म्हणजे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होईल आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी होईल एकूणच त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता सर्वाधिक राहणार आहे. त्यामुळे विजय आणि पराभव यामध्ये महायुतीची चित आणि पट पण महायुतीचीच असणार आहे.

मागील महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी १६२ पैकी बहुतांश जागांवर एकमेकांसमोर उमेदवार उभे केले होते. त्यातल्या ८५ जागांवर थेट आणि चुरशीची स्पर्धा झाली, ज्यात भाजपने ५० जागा तर राष्ट्रवादीने ३५ जागा जिंकल्या होत्या. सध्याची प्रभाग रचना ही नव्याने तयार करण्यात आली असली तरी ती जुन्या प्रभाग रचनेप्रमाणेच आहे. जर महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असती.

तर या ८५ जागांवर दोन्ही पक्षांपैकी एका बलवान उमेदवाराला माघार घ्यावी लागली असती आणि तो मजबूत उमेदवार आपोआपच महाविकास आघाडीच्या पदरात पडला असता. या पार्श्वभूमीवर “दोघांचे भांडण सोडून तिसऱ्याला फायदा नको” या विचाराने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सत्ताही आपली आणि विरोधकही आपलाच..

आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे बहुतांश जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करतील, पण लढत मैत्रीपूर्ण स्वरूपाची राहील. एकमेकांसमोर असूनही दोन्ही पक्षांचे लक्ष विरोधी उमेदवारांना हरवून आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मदत करण्यावर असेल.

ज्या प्रभागांमध्ये भाजपचे वातावरण अनुकूल आहे, तेथे राष्ट्रवादी काँग्रेस सामंजस्याने माघार घेईल किंवा कमकुवत उमेदवार देईल; तर जेथे राष्ट्रवादीला मजबूत स्थिती आहे, तेथे भाजप सहकार्य करेल. यामागचा मुख्य हेतू भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू नये आणि महाविकास आघाडीतील मतांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात विभाजन घडवून आणणे हा आहे. निवडणुकीनंतर गरज पडल्यास सत्ता स्थापनेसाठी हे तिन्ही पक्ष (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी रणनीती आखली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT