Pune News: महायुतीसरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचवेळी भाजपकडून संघटनात्मक बदलासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच भाजपनं आता मुंबईनंतर आपला पूर्ण फोकस हा पुण्याकडेही वळवला आहे. त्याच पुणे भाजप (BJP) शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांसाठी उद्याचा रविवार (ता.27) अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे भाजप शहराध्यक्षपदी कुणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. किंबहुना फडणवीसांसाठी पुण्याचा कारभारी म्हणून कुणाकडे जबाबदारी द्यायची हा टफ कॉल असणार आहे. पुणे शहर भाजपचा नवीन शहराध्यक्ष निवडण्यासाठी रविवारी (ता. 27) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. यामध्ये प्रदेशाकडून पाठविण्यात आलेले पर्यवेक्षक आणि निरीक्षक यांच्यापुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याला शहराध्यक्षपदासाठी योग्य असलेल्या तिघांची नावे सांगावी लागणार आहे. यामध्ये एक नाव महिलेचे असणे बंधनकारक आहे. यामुळे भाजपमधील इच्छुकांनी त्यांच्या नावाचा प्रभाव पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
पुण्याच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी धीरज घाटे यांच्याकडे आहे. त्यांची मुदत संपल्याने आता नवीन शहराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया प्रदेश भाजपने सुरु केली आहे. यासाठी पर्यवेक्षक खासदार धनंजय महाडीक(Dhananjay Mahadik), निरीक्षक शेखर इनामदार हे दोघेजण शहर कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत.
धीरज घाटे यांनी त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. त्यास काही पदाधिकारी देखील अनुकूल आहेत. त्याच प्रमाणे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर यांची नावेही चर्चेत आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनीही शहराध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच प्रमाणे आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर यांचेही नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
भाजपमधील महिलांची नावे शहराध्यक्षपदासाठी चर्चेत नसली तरी आता प्रदेशाकडून शहरातील पदाधिकाऱ्यांना महिलांचे नाव सुचविणेही बंधनकारक आहेत. त्यामुळे अनेक वर्ष भाजपसाठी काम करणाऱ्या, माजी नगरसेवक राहिलेल्या महिला कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे अशा महिलांकडूनही त्यांच्या नावाचा पाठपुरावा केला जात आहे.
रविवारी दुपारी दोननंतर धनंजय महाडीक, शेखर इनामदार हे प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक संवाद साधून शहराध्यक्षपदासाठी कोण योग्य आहे हे जाणून घेणार आहेत. प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहरातील सर्व सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा यासह अन्य मोर्चांचे शहराध्यक्ष, विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार हे नव्या शहराध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविणार आहेत. याचा गोपनीय अहवाल पर्यवेक्षक व निरिक्षकांकडून प्रदेशाला सादर केला जाईल. त्यानंतर तेथे प्रदेशाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा होऊन त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब केला जाईल.
भाजपने 26 मंडल अध्यक्षांची नावे जाहीर केली, पण त्यात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. आता शहराध्यक्ष पदासाठी नावे जाणून घेताना प्रत्येक पदाधिकाऱ्याला एका महिलेचे नाव सुचवावे लागणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत महिलांची नावे आली तरी अंतिम निर्णय घेताना शहराध्यक्षपदासाठी महिलेचे नाव जाहीर कोणार का? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.