Cm Devendra Fadnavis sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis: 'मोठ्या गाड्यांत फिरणाऱ्यांना पाच हजारांचे महत्त्व कळणार नाही’; फडणवीसांचा विरोधकांना टोला

Maharashtra Drought: खरीप पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. या मदतीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

Sudesh Mitkar

Maharashtra Drought News : पावसातील खंड आणि अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचे पैसे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र, या मदतीच्या रकमेवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. ‘पाच हजार रुपयांत नेमके काय होणार?’ असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

पावसातील खंड आणि अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे सहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी मिळणारी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार देणार आहे.

या मदतीवरून विरोधकांकडून टीका होत असताना पुण्यात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "ज्यांना मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरण्याची आणि मोठमोठ्या घरांमध्ये राहण्याची सवय आहे, त्यांना पाच हजार रुपयांचे महत्त्व कळू शकत नाही. ते शेतकऱ्यांना कळते. ही अग्रीम मदत आहे, हे सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्यांना आम्ही आणखी मदत करणारच आहोत."

ते पुढे म्हणाले, "यापूर्वीचा इतिहास पाहिला, तर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत महायुतीच्या सरकारने केली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. तेच आता सरकारवर टीका करत आहेत. मात्र, विरोधक काहीही बोलले तरी आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत."

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असल्याची दखल घेऊन संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारची मदत आणि राज्य सरकारची मदत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT