

Dia Mirza Video Controversy : सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळा, असे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडीओवरून मुंबईत राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांच्या ट्विटनंतर मुंबई महानगरपालिकेने दिया मिर्झा यांचा व्हिडीओ हटवला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह मनसेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नयेत आणि प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करणारे जनजागृतीचे व्हिडीओ तयार केले होते. यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, डॉ. निशिगंधा वाड, हर्षदा खानविलकर, दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता.
मात्र, भाजप आमदार अमित साटम यांच्या ट्विटनंतर महापालिकेने दिया मिर्झा यांचा व्हिडीओ हटविल्याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. एका बाजूला प्रदूषणाविरोधात जनजागृती करणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ हटवला जात असल्याने राजकीय वर्तुळातही या प्रकरणाचे पडसाद उमटले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता त फडणवीस म्हणाले, "मला वाटत नाही की उच्च न्यायालयाने काही फटकारले असेल किंवा एखादे मत व्यक्त केले असेल. ही केस उच्च न्यायालयात गेलेलीच नाही. त्यामुळे फटकारण्याचा विषयच येत नाही." ते पुढे म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेने व्हिडीओ डिलीट केला आहे. कुठल्याही ठिकाणी एखादे हँडल चालवत असताना त्यावर काय ठेवायचे आणि काय काढायचे, हा ज्याचे हँडल आहे त्याचा अधिकार आहे. त्यांनी तो व्हिडीओ हटवला आहे."
दिया मिर्झा यांच्या सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, दिया मिर्झा या चांगल्या आणि प्रतिष्ठित अभिनेत्री असतील; पण त्या काही भारताच्या खूप मोठ्या नेत्या नाहीत. त्यामुळे मला असे वाटते की, हा आमच्या लेव्हलचा विषय नाही. तुम्ही आमच्या लेव्हलचे विषय विचारा, छोट्या लेव्हलचे विषय विचारू नका," असे स्पष्ट केले.
दरम्यान, प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ हटविण्याच्या निर्णयावरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस \यांनी या विषयाला फारसे महत्त्व न देता पत्रकारांनाच मोठ्या विषयांवर प्रश्न विचारण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्या वक्तव्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.