Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

CM Fadnavis Meeting : भाजप नगरसेवक अडचणीत, CM फडणवीसांसमोर हजेरी! मतांचाही हिशेब मागवणार

Pune MLC Election : प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या नगरसेवकांची थेट मुख्यमंत्री हजेरी घेणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात होत असलेल्या बैठकीत ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Roshan More, Sudesh Mitkar

Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यक्रमांना दांडी मारणाऱ्या नगरसेवकांपाठोपाठ आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील कामगिरीचाही हिशेब घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येत असून, बावधन येथील बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांची संयुक्त झाडाझडती घेणार आहेत.

पदवीधर मतदारांची किती नोंदणी केली, त्यापैकी भाजपला किती मते मिळू शकतात आणि विरोधात मतदान करू शकणारे मतदार किती, याची माहिती नगरसेवकांना सादर करावी लागणार आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिलेल्या ९६ नगरसेवकांचीही या बैठकीत कानउघाडणी होण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या तयारीसाठी लक्ष केंद्रित केले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीला भाजपने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, पक्षाच्या कार्यक्रमांना गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांसमोरच नगरसेवकांना आपल्या कामाचा लेखाजोखा मांडावा लागणार असल्याने भाजपच्या स्थानिक वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत.

नोंदणीपासून मतदानाच्या गणितापर्यंत हिशेब

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने नगरसेवकांसह पक्षातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपवली आहे. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारांची संख्या ८८ हजारांहून अधिक असल्याने या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या भागात किती मतदारांची नोंदणी केली, त्यापैकी भाजपच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता असलेले मतदार किती आणि विरोधी भूमिका घेऊ शकणारे मतदार किती, याचा तपशील तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदारांचे अ, ब आणि क अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करून निवडणुकीचे नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे केवळ मतदार नोंदणीच नव्हे, तर प्रत्यक्ष मतदानात पक्षाला किती फायदा होईल, याचीही चाचपणी केली जाणार आहे. निवडणुकीची जबाबदारी दिल्यानंतरही अपेक्षित काम न करणाऱ्या नगरसेवकांना या बैठकीत जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.

CM फडणवीस मैदानात

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव, तर शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील कोअर कमिटीच्या बैठका घेऊन निवडणुकीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान या बैठकीतून भाजपच्या स्थानिक संघटनेला निवडणुकीसाठी अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न होणार असला, तरी गैरहजेरी आणि कामातील निष्क्रियतेबाबत पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT