BJP Pune Meeting Latest News : आगामी राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज रविवार पुण्यात होत आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक असल्याने भाजपच्या वर्तुळात या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या बैठकीला पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय व राज्य परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, विविध मोर्चांचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच माजी खासदार आणि माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. आगामी संघटनात्मक वाटचाल, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असून, राजकीय व सामाजिक विषयांवरील ठरावही मांडले जाण्याची शक्यता आहे. बैठकीच्या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पुण्यात दाखल झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे स्वागत केवळ नोंदणीपुरते मर्यादित राहिले नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या हातात दोन बॅगचे खास किट देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेपेक्षा सध्या भाजपच्या या ‘किट’चीच चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षाच्या वतीने एका बॅगेत दोन पुस्तके देण्यात आली आहेत. त्यामध्ये ‘वंदे मातरम्’ संदर्भातील पुस्तक आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘आनंदमठ’ यांचा समावेश आहे. याशिवाय तिरंगा रॅलीच्या संदर्भातील मासिक, पक्षाचे उपरणे, टोपी आणि विविध पत्रकेही या हॅण्डबॅगमध्ये देण्यात आली आहेत.
दुसरीकडे, पुण्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत असल्याने केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना पुण्याची खास भेट देण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिमा, पुण्याची स्पेशल बातमी बर्फी आणि चिवडा या स्वरूपात हे किट देण्यात आले आहे.
त्यामुळे एकीकडे पक्षाचा वैचारिक आणि संघटनात्मक संदेश देणारी पुस्तके, तर दुसरीकडे पुण्याची धार्मिक आणि खाद्यसंस्कृती दाखवणारी भेट, असा या किटचा ‘पॅकेज’ चर्चेचा विषय ठरला आहे.
बैठकीच्या ठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी जिल्हानिहाय नोंदणी कक्ष उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून बैठकीला नेमके किती पदाधिकारी उपस्थित राहिले, याची नोंद पक्षाकडून केली जात आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीची बैठक असली तरी संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा आकडा याकडेही भाजपचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यामुळे बैठकीतील निर्णयांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, बैठक सुरू होण्याआधीच दोन बॅगा आणि त्यातील ‘स्पेशल किट’ने पुण्याच्या राजकारणात चर्चेचा नवा विषय निर्माण केला आहे.