Pune News: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजपच्या वाट्याला येत असलेल्या 6 जागांसाठी तब्बल 30 उमेदवारांची यादीत फायनल करण्यात आली आहे. ही यादी दिल्लीदरबारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली आहे. दिल्लीतूनच उमेदवारांची नावं निश्चित करण्यात येणार आहे. पण याच यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तो मागे घेतला होता. महायुतीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात तत्कालीन विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासाठी सुटल्यामुळे भाजपला या जागेवरचा हक्क सोडावा लागला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी फोन करून समजूत काढल्यानंतर मुळीक यांनी अर्ज न भरताच माघार घेतली होती.
विधानसभा निवडणुकीवेळी जगदीश मुळीक यांना देवेंद्र फडणवीसांनी या माघारीची योग्यवेळी दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याचं समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीसांची योग्यवेळ विधान परिषदेच्या निमित्तानं जुळुन येणार असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.
वडगाव शेरीचे माजी आमदार आता मुळीक यांचं नाव विधान परिषदेसाठी समोर येत आहे. ते 2014 ला वडगाव शेरी मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्याकडे पुणे शहराध्यक्षपदाचा अनुभव आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुळीक यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
माजी आमदार आणि भाजप नेते जगदीश मुळीक यांनी काही नोव्हेंबर महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. मुळीक यांच्या हृदयशस्त्रक्रियेच्या (By-pass Surgery) वेळी फडणवीस यांनी अवघ्या तीन मिनिटांत डॉक्टरांशी संपर्क साधून तातडीनं व्यवस्था केली होती. हाच अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात मुळीक यांनी फडणवीसांना 'देवाभाऊ' (देवाभाऊ) संबोधलं होतं. त्यांच्या आरोग्य संकटाच्या काळात फडणवीस यांनी एका भावाप्रमाणे काळजी घेतल्याचे सांगितले. या मदतीमुळे भारावून जात मुळीक यांनी फडणवीसांना "माझे देवाभाऊ" म्हणत भावनिक पोस्ट केली होती.
दिल्लीला पाठवलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत राम सातपुते, जगदीश मुळीक,राजेश पांडे, माधव भंडारी, केशव उपाध्ये, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रशांत परिचारक, सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर, राजीव पोतदार, संजय केनेकर, सुनील कर्जतकर, प्रज्ञा सातव, राजेंद्र राऊत, अर्चना पाटील चाकूरकर, दयाशंकर तिवारी, नीता केळकर, अतुल काळसेकर या नेतेमंडळींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी भाजपसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून सुरु आहे. 30 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सध्या जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.
महायुतीमधील भाजपच्या वाट्याला सर्वाधिक पाच जागा आल्या आहेत. या पाच जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. राज्यातील कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार पडली. या मध्ये जवळपास 30 जणांची यादी फायनल करून दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहे. त्यामधून पाच जणांच्या नावाची घोषणा दिल्लीतून करण्यात येणार आहे. यात प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, दिल्लीचा पत्ता गुलदस्त्यात असतानाच भाजपच्या गोटातून समोर आलेल्या मुळीक यांच्या नावामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.