Devram Lande
Devram Lande Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या आदिवासी नेत्याला जीवे मारण्याची धमकी

दत्ता म्हसकर

जुन्नर : (जि. पुणे) : शिवसेनेला दसरा मेळाव्यात ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य देवराम लांडे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्नरचे शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काकडे यांच्या विरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. (Devram Lande threatened to kill; Filed a case against Shiv Sena junnar taluka deputy chief)

स्पीड पोस्टाने आलेल्या या पत्रातील सर्व मजकूर टाईप केलेला असून फक्त पत्र पाठविणार मंगेश काकडे यांचा पत्ता शाईने लिहिलेला आहे. पत्रात वरच्या बाजूला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आणि शिवसेनेचे धनुष्यबाणाचे चिन्ह आहे. मागील निवडणुकीत मंगेश काकडे यांनी शिवसेनेकडून पिंपळवंडी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. लांडे यांना आलेले धमकीचे पत्र व मंगेश काकडे यांचा उल्लेख यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून समाज माध्यमांमध्ये या प्रकरणाची उलटसुलट चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

देवराम लांडे यांच्या पत्रात शिवसेनेने संधी देऊन जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिले. तू पक्षाशी गद्दारी केली. पक्षाची बदनामी केली, यामुळे ज्या आदिवासी जनतेने निवडून दिले, त्याच आदिवासी भागात तुझा शेवट ३१ डिसेंबरपूर्वी करणार असल्याची धमकी या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

यापूर्वी जुन्नर तालुक्यातील चावंड येथे देखील दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या इसमाने देवराम लांडे यांना धमकी दिली होती. तसेच, विनयभंगाची फिर्याद दाखल करणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ यांच्या साक्षीमुळे देवराम लांडे यांच्या विरोधात पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नव्हती, असेही लांडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT