Vidyadhar Anaskar, Vijay Dhere Latest News Sarkarnama
पुणे

महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनवर ढेरे, अनास्करांनी मारली बाजी!

Election : ढेरे यांना काळे यांच्यापेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अत्यंत चुरशीच्या झालेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनच्या निवडणुकीत पुणे-नगर- सोलापूर मतदारसंघातून फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि पुणे मर्चंट्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांनी बाजी मारली आहे. अनास्कर यांना या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली.

दरम्यान, ही निवडणूक कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हे पुणे विभागातून निवडणूक लढवीत होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. पुणे विभागात दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ४४ पैकी ४३ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी दोन मते बाद झाली होती. उर्वरित ४१ मतांपैकी अनास्करांना ३२, ढेरेंना २०, मिलिंद काळे यांना १९ मते तर आनंद गावडे यांना १० मते मिळाली.

ढेरे यांना काळे यांच्यापेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले. फेडरेशनची निवडणूक बिनविरोध करण्याचे विद्यमान संचालकांनी निश्चित केले होते. त्यानुसार सर्वानुमते २१ पैकी १२ जागा बिनविरोध पार पाडल्या. मात्र उर्वरित ९ जागांवर अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक घेण्यात आली होती.

निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी मुंबई येथील ३, पुणे येथील २ आणि कोकण विभागातील १ अशा एकूण सहा जागांवर अनास्कर यांच्या पॅनेलला विजय मिळाला.

राज्यातील नागरी सहकारी बँकांचे पालकत्व स्वीकारलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभर मतदान झाले होते. १४ नोव्हेंबर रोजी फेडरेशनच्या वडाळा येथील कार्यालयात मतमोजणी पार पडली.

दरम्यान, मतमोजणीत आम्हाला मिळालेली मते ही राज्यातील नागरी सहकारी बँकांनी आमच्या कामाची दिलेली पोचपावती आहे. मतदारांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे मत महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT