'50 खोके' दुखवताहेत डोके? बंडखोर आमदारांमध्ये वाढतेयं अस्वस्थता...

Shivsena : बंडखोर आमदारांना या घोषणेने त्रास होतो. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेरलं आहे.
Eknath Shinde MLA Group Latest News
Eknath Shinde MLA Group Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसोबत बंड केलेल्या 40 आमदारांना उद्देशून विरोधकांनी '50 खोके एकदम ओके' असे म्हणत त्यांना डिवचण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

या घोषणा कुठे सभेत, प्रेस कॉन्फरन्समध्ये तर कधी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर देखील घुमतांना दिसल्या. बंडखोर आमदारांवर केला जाणारा हा थेट आरोप मात्र त्यांच्या पचणी पडताना दिसत नाही. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटूनही खोक्याचा विषय निघाला की शिंदे गटातील आमदार मंत्र्यांचे डोके दुखायला लागते. हे मात्र तितकचं खर आहे. (Eknath Shinde MLA Group Latest News)

Eknath Shinde MLA Group Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

आता प्रश्न असा आहे की, विरोधक म्हटलं की ते टीका करणारचं. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 50 खोक्यावरून केलेली ही टीका बंडखोर आमदार, मंत्र्यांना चांगलीच झोंबताना दिसतेयं. या घोषणेवरून शिंदे गटातील काही मंत्री आणि आमदारांनी केलेले वक्तव्य बघितल्यास 50 खोके डोके दुखवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर झालेल्या अधिवेशन काळात विरोधकांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केलेलं आंदोलन आणि त्यात दिलेल्या घोषणा बंडखोर आमदारांच्या चांगल्याच जिव्हारी लागलेल्या दिसल्या. त्यामुळेच त्यांना काउंटर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही आंदोलन करावे लागले होते.

दरम्यान, 'पन्नास खोके एकदम ओके' या घोषणेवर मंत्री शंभूराजे देसाई यांनी लगेच चिडून तुम्हालाही खोके हवेत का? असा प्रतिप्रश्न विचारून खोक्याच्या घोषणेला आणखीनच हवा दिली. मग काय बंडखोरांना या घोषणेने त्रास होतो. हे हेरत महाविकास आघाडीचे नेत्यांनी आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांना डिवचण्याची कुठलीही संधी सोडली नाही. त्यापुढे जाऊन शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तर खोक्याचा रावण करून दहन करण्यात आला. यामुळे या घोषणेचा आणखीनच भडका उडाला.

Eknath Shinde MLA Group Latest News
मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्री-आमदारांवरील कंट्रोल सुटतोय?; 'या' वक्तव्यावरून झाली आतापर्यंत गोची...

अगदी अलीकडचं खोक्यावरून झालेल्या वादाचं उदाहरण घ्यायचं झाल्यास मंत्री अब्दुल सत्तार यांनी खोक्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केली. यामुळे त्याचे राज्यभर पडसाद उमटले यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जाहीर सभेत दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. हे झालं सत्तारांचं. बंडखोर आमदार संतोष बांगर यांनीही या घोषणा देणाऱ्यांचं थोबाड रंगवा, असा आदेशचं आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर शिंदे गटात गेलेले माजी आमदार विजय शिवतरे यांनी या घोषणेवरून कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

हे झालं शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदारांचं. मात्र या वादात अपक्ष आमदारही काही मागे नाहीत. अपक्ष आमदारांचे नेतृत्व करणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट खोक्याचा आरोप करून राज्यातील वातावरण चांगलच तापवलं. हे इतकं तापलं की, ते थंड करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र तरीही खोक्यांच्या घोषणेचा मुद्दा उरतोच.

Eknath Shinde MLA Group Latest News
अंधेरीच्या माघारीतून फडणवीसांचा आशिष शेलारांवर नेम?

बच्चू कडूंच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठल्याही लग्नात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात गेलो की लोक खोक्यावाला आमदार आला, असे म्हणून हिणवत असल्याने उगीच बदनामी होत असल्याचं त्यांनी कबूल केलं. मात्र याच मुद्द्यावरून बंडखोर आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. कारण ही घोषणा आणि आरोप आता राजकीय विरोधकांपर्यंतच राहिले नाही तर आता सामान्य नागरिक सुद्धा आमदारांना बघून '50 खोके एकदम ओके', असे सहज बोलू लागले आहेत. उदाहरणार्थ यंदा झालेल्या बैलपोळ्याला बैलांच्या अंगावर काढलेली 50 खोके एकदम ओकेची घोषणा, असो किंवा सोशल मीडियावर यावरून केलं जाणार ट्रोल असो यामुळे शिंदे गटातील आमदार डोक्यालाच हात लावत असतील. हे खरं.

दरम्यान, निवडणुकीत वातावरण निर्मिती करण्यासाठी काही सकारात्मक घोषणा दिल्या जातात. तर कधी नकारात्मक घोषणाही दिल्या जातात. यामध्ये २०१४ साली लोकसभा निवडणुकी आधी पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिन आने वाले है! ,अशी घोषणा देत मतदारांना भाजपशी जोडले. तर २०१४ ला महाराष्ट्रात कॅाग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करण्यासाठी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' ही नकारात्मक घोषणा भाजपने खुबीने वापरली आणि त्याचा फायदाही त्यांना झाला होता.

आता '50 खोके एकदम ओके' ही घोषणा अशीच निवडणुक काळापर्यंत चर्चेत राहिली तर बंडखोर आमदारांचं टेन्शन वाढवणार आहे. त्यामुळेच या आरोपावरून बंडखोर आमदार चिडून उत्तर देत असल्याचं दिसतयं. हे असेच सुरू राहिले तर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये दिवसेंदिवस आधिकच अस्वस्थता वाढत जाणार अन् खोक्याचा प्रश्न डोक दुखवणार. हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com