Sudhir Mungse, Vilas Lande, Dilip Mohite  Sarkarnama
पुणे

Dilip Mohite News : हिंमत असेल तर विलास लांडेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; आमदार मोहितेंनी दिले चॅलेंज

सरकारनामा ब्युरो

हरिदास कड

Chakan News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला आहे. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काहीसा बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील काही नगरसेवक शरद पवार गटाकडे स्वतः बैठक घेऊन पाठवून दिले आहेत. माजी आमदार विलास लांडे व त्या संबंधित नगरसेवकांची लोणावळा येथे एक बैठक झाली त्याचे पुरावे ही आहेत. त्या बैठकीला लांडे हे उपस्थित होते. निवडणूक काळात विलास लांडे हे शरद पवार गटाला मदत करतात, असा आरोप करीत त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खेड-आळंदी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी दिले. (Dilip Mohite News)

चाकण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोहिते यांनी लांडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. खेड तालुक्यात येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे तालुक्यात राजकीय गरमागरमी मोठी आहे. विविध पक्षाकडे अनेकजण इच्छुक आहेत.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार मोहिते यांची उमेदवारी निश्चित आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. विद्यमान आमदार मोहिते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मोहिते यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ते जोरात प्रयत्न करीत आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, माजी सभापती रामदास ठाकूर हे ही इच्छुक आहेत.

सुधीर मुंगसे यांचे सासरे माजी आमदार विलास लांडे यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांना भोसरीत रोखण्यासाठी नगरसेवक अजित गव्हाणे तसेच इतर नगरसेवक यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश दिला असल्याचा आरोप आमदार मोहिते यांनी केला आहे.

खुलेआम विरोधात जावे

माजी आमदार विलास लांडे यांचे अजित गव्हाणे जवळचे नातेवाईक आहेत. ते ही अजित पवार गटात होते. माजी आमदार विलास लांडे यांचे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात त्यांचे जावई सुधीर मुंगसे यांना विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नगरसेवक व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. पवार गटाशी सलगी बाळगणाऱ्यांनी अजित पवार गटात राहण्यापेक्षा खुलेआम विरोधात जावे, असा इशारा मोहिते यांनी दिला.

जावयाला पुढे न करता निवडणूक लढवा

माजी आमदार विलास लांडे यांनी जावयाला पुढे करण्यापेक्षा माझ्या विरोधात स्वतः निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आवाहन आमदार दिलीप मोहिते यांनी दिले. माजी आमदार विलास लांडे यांच्या पक्ष विरोधातल्या वागणुकीबाबत अजित पवार यांच्याकडे तशी तक्रारही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या विरोधात केले काम

स्व. आर. आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना विलास लांडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, आर. आर. पाटील यांना माझ्याबद्दल खोटे सांगून मला व माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला होता. माझ्या विरोधात खोटे सांगून शरद पवारांचे मतही माझ्याबद्दल वाईट केले. खेड तालुक्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा प्रचार न करता बाजार समितीच्या निवडणुकीत भाच्याचा प्रचार लांडे यांनी केला. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बरोबर राहून पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेले आहे, असे आमदार मोहिते यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT