Dilip Walse Patil On Milk Adulteration Allegations sarkarnama
पुणे

Dilip Walse Patil Video : 'एका मिनिटाचाही विचार न करता निवृत्ती घेणार', 'त्या' आरोपानंतर दिलीप वळसे-पाटील व्यथित; विरोधकांना ओपन चॅलेंज!

Dilip Walse Patil On Milk Adulteration Allegations : दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या आरोप करणाऱ्या विरोधकांना ओपन चॅलेंज देत थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आंबेगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. मागील काही काळांपासून विरोधक माजी गृहमंत्री, विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांना टार्गेट करत होते. वळसे पाटील यांच्या संबंधित असलेल्या दूध संस्थांमध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर आरोप केला जात होता. त्याला वळसे पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

'अशा प्रकारच्या भेसळीच्या प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध आढळल्यास, मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. एक मिनिटसुद्धा वाट बघणार नाही.', असे त्यांनी जाहीर करत या प्रकरणात आपले नाव जोडून प्रतिमा मलीन करणे हे एक नियोजित 'राजकीय षड्यंत्र' असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांनी ​व्हिडिओ संदेशाद्वारे आपली अधिकृत भूमिका मांडताना म्हटले की, 'गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या माध्यमातून राज्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायावर तपासणी करून त्यांच्यावर कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा दुधाच्या व्यावसायाच्या निमित्ताने काही ठिकाणी एफडीएने चौकशी करून त्याच्याबद्दल कारवाई केलेली आहे. एफडीएची कारवाई अजूनही सुरू आहे.'

'या संदर्भामध्ये माझे काही राजकीय विरोधक जाणूनबुजून ज्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही, अशा गोष्टीचं नाव जोडून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या संदर्भामध्ये मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे, की अशा प्रकारची भेसळ करणारी व्यक्ती किंवा कंपनी किंवा संस्था कुठली जरी असली, तरी त्याला मी पाठीशी घालणार नाही. एफडीए विभाग त्यांच्यावर कारवाई करायला पूर्णपणे सक्षम आहे आणि पोलीस विभाग देखील त्यांच्यावर कारवाई करायला सक्षम आहे.'

परंतु जाणूनबुजून माझं चारित्र्यहनन करण्याच्या दृष्टिकोनातून, मला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातून काही विघ्नसंतोषी, अल्पसंतोषी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा, सभांच्या माध्यमातून भूमिका मांडून माझ्यावर खोटे-नाटे आरोप करत आहेत.

या संदर्भामध्ये मी पहिल्यांदाच हे स्पष्ट करू इच्छितो, अशा प्रकारच्या भेसळीच्या प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध आढळल्यास, मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. एक मिनिटसुद्धा वाट बघणार नाही.

आरोप करणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार

खोटं-नाटं जाणीवपूर्वक कोणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील, तर त्यांना देखील मी या निमित्ताने इशारा देतो, की गेले काही दिवस मी मुद्दाम तुमची भूमिका समजून घेत होतो. पण यापुढे तुम्ही असाच तुमचा प्रयत्न चालू ठेवला, माझी बदनामी चालू ठेवली, तर निश्चित तुमच्यावर फौजदारी आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या नुकसानभरपाईचा दावा मी हायकोर्टामध्ये करायला मागे-पुढे पाहणार नाही, तर करणारच आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला.

चुकीच्या गोष्टीशी संबंध नाही...

त्यामुळे आतातरी या अशा अल्पसंतोषी व्यक्तींनी माझी बदनामी करायचं थांबवावं, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जायची तयारी ठेवावी. आणि पुन्हा एकदा मी आंबेगाव तालुक्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो, की अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीशी माझा दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. तो संबंध कोणी सिद्ध करून दिल्यास, मी पुन्हा एकदा सांगतो की मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. असा पुनरुच्चार वळसे पाटील यांनी केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT