Dilip Walse Patil sarkarnama
पुणे

अन् गृहमंत्र्यांनी भरसभेतच दिले पाबळच्या 'मनोरंजना'ची दखल घेण्याचे आदेश...!

डॉ. देशमुखांनीही तितक्याच गांभिर्याने दखल घेण्यास होकार दिला.

भरत पचंगे

शिक्रापूर : शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाबळ (ता. शिरूर) उपबाजाराच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी सभापती शंकर जांभळकर यांनी उपबाजाराच्या जागेवर पूर्वी मनोरंजन चालू होते ते आम्ही बंद केले असे सांगितले. जांभळकरांच्या मनोरंजन या शब्दाचा अर्थ मला समजला नाही.’ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी म्हटले. उपस्थितांपैकी काहींनी लगेच मनोरंजन म्हणजे जुगार-दारुगुत्ते असल्याचे सांगताच व्यासपिठावरच उपस्थित जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचेकडे कटाक्ष टाकत वळसे पाटील यांनी या मनोरंजनाची दखल घ्या असे, आदेशच दिले.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने ५७ वर्षे पडीक राहिलेल्या पाबळ येथील आपल्या ४ एकर क्षेत्रात उपबाजार सुरू करुन त्याचे उद्घाटन रविवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते केले. हे काम माजी सभापती शंकर जांभळकर यांनी स्वत: करुन घेतले. हे काम करताना या ठिकाणी जुगारी, दारु अड्डे चालू असल्याचे सर्वश्रुत होते. हेच सांगताना जांभळकर यांनी जुगारी-दारुअड्डे यांचा नामोल्लेख 'मनोरंजन' असा केला. हाच तो 'मनोरंजन' शब्द वळसे पाटील यांनी पकडला आणि भाषणाच्या सुरवातीलाच जांभळकर यांना विचारले.

'दादा, हे मनोरंजन समजले नाही मला..' उपस्थितांपैकी काहींनी लगेच यावर खुलासा करीत सांगितले की, मनोरंजन म्हणजे जुगार-दारुगुत्ते. बाजार समितीच्या पडीक जागेत गेली अनेक वर्षे जुगार-दारुगुत्ते चालू असल्याची माहिती वळसे पाटलांना समजताच त्यांनी तात्काळ व्यासपिठावरच उपस्थित जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचेकडे कटाक्ष टाकून या मनोरंजनाची दखल घ्या, असे सांगितले. डॉ. देशमुखांनीही तितक्याच गांभिर्याने दखल घेण्यास होकार दिला. डॉ. देशमुख हे आमदार अशोक पवार यांच्या शेजारीच बसलेले असल्याने या दोघांचीही यावेळी नजरानजर झाली. पाबळच्या मनोरंजनाच्या कारवाईची थेट एसपींनी दखल घेतल्याची उपस्थित जनसमुदायाची खात्री झाली.

अशी आहे पाबळच्या 'मनोरंजना'ची पार्श्वभूमि...!

पाबळमध्ये गेल्या चार महिन्यात दोन मोठ्या जुगारांवरील कारवाया झाल्या. यातील दोन्ही कारवायांमध्ये खेड व आंबेगाव तालुक्यातून काही जुगारी पाबळमध्ये येवून जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले. चार महिन्यांपूर्वीच्या कारवाईत हा अड्डा एका डोंगरमाथ्यावरील एका घरामध्ये चालला होता. १४ आरोपींवर गुन्हे दाखल करुन केलेल्या या मोठ्या कारवाईने पाबळमधील जुगार बंद होईल असे वाटले होते. मात्र, तसे काहीच न होता थेट जिल्हा पोलिसांनाच आव्हान देत पुन्हा जुगार अड्डा सुरू झाला. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या गोपनीय माहितीनुसार पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी स्वत: येवून कारवाई करुन ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. ही सगळी पार्श्वभूमि पाबळमधील अवैध धंद्यांची असल्याने राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे मनोरंजन बंद करण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT