Dilip Walse Patil sarkarnama
पुणे

बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची वळसे पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी : लवकरच निर्णय

जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची नुकतीच एक बैठक मुंबईत पार पडली.

भरत पचंगे

शिक्रापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) या दोघांच्या उपस्थितीत नुकतीच बैलगाडा शर्यती (Bullock cart race) सुरू करण्याबाबतची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडलेली. बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठीचा अध्यादेश काढण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे. मात्र, या प्रश्नी खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असल्याने न्यायालयातही लढण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने सुरू केल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाबळ (ता.शिरूर) येथे दिली. (Dilip Walse Patil said about starting bullock cart race)

पाबळ (ता. शिरूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात आणि पाबळ-केंदूर भागासाठी थिटेवाडी बंधा-यात पाणी आणण्याची दोन निवेदने सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर चौधरी यांनी वळसे पाटील यांना दिली. यावेळी बैलगाडा शर्यतींबाबत बोलताना वळसे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार म्हणून गंभीरपणे पावले उचलत असून या विषयाला अनुसरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची नुकतीच एक बैठक मुंबईत पार पडली.

महाआघाडी सरकार सध्या दोन स्तरांवर काम करीत आहे. पहिले म्हणजे बैलगाडा शर्यती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश काढणे. दूसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जो बैलगाडा शर्यतींबाबत खटला सुरू आहे. तो खटला पाच न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे वर्ग करण्यासाठी मुख्य न्यायाधिशांना विनंती करुन या खटल्याच्या सुनावण्या लवकरात लवकर खंडपिठाकडे होतील यासाठी प्रयत्न करणे, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान केंदूर-पाबळचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी माझे प्राधान्य असून त्या दृष्टीनेही आपले प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीबाबत पाटलांचे मौनच..!

केंदूरच्या सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी आपल्या पदाचे राजिनामे देत केंदूरसाठी यावेळी ३० वर्षांनंतर संधी द्यावी, अशी मागणी केलेली आहे. पाबळ-केंदूर गटात सध्या पाबळच्या सविता बगाटे या जिल्हा परिषद सदस्या असून या गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच होणार आहे. त्यातच पाबळ उपबाजार उभा करणारे माजी सभापती शंकर जांभळकर व माजी सभापती प्रकाश पवारही चर्चेत आहे.

याच अनुषंगाने वळसे पाटील येवू घातलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीबाबत काही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीच बोलले नसल्याने राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या यादीत असलेले माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, सुभाष उमाप, उपसभापती सविता प-हाड, केंदूरच्या सरपंच सुवर्णा थिटे, माजी सरपंच विमलताई थिटे, उद्योगपती प्रमोद प-हाड, सतीश थिटे, सनी थिटे, सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक विकास नाना गायकवाड, खैरेवाडीचे माजी सरपंच एकनाथ खैरे व वाजेवाडीचे माजी सरपंच धर्मराज वाजे आदींना, मात्र आता काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT