Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

चंद्रराव आणि रंजन तावरेंना धक्का : ‘माळेगाव’च्या संचालकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

कल्याण पाचांगणे

माळेगाव (जि. पुणे) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पॅनेलमधून निवडून आलेले संचालक प्रताप जयसिंग आटोळे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. अर्थात, हा प्रवेश अचानक जाहीर झाल्याने सभास्थानी एकच खळबळ उडाली. प्रताप आटोळे यांनी विरोधी पार्टीचे संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांना सोडचिठ्ठी देत पवारांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे विरोधी पार्टीत आता गुलाबराव गावडेंसह अवघे तीनच संचालक उरले आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दसऱ्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आटोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पवार यांनी एकरक्कमी एफआरपीबाबतही भाष्य केले.

ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने यंदा उसाची एफआरपी एकरकमी देण्याबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. परंतु ज्या त्या वर्षीच्या साखर उताऱ्याच्या आधारे एफआरपी ८०-२०च्या सूत्रानुसार दिल्यास व्याजात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळू शकतात. या धोरणामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना प्रतिटन तीनशे रुपये अधिकचे मिळतात. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अर्थात या सकारात्मक बाबींचा गांभीर्याने विचार शेतकरी संघटनांसह सभासदांनी केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, त्यांनी साखरेची किमान आधारभूत किंमतही ३१०० रुपयांवरून ३६०० रुपयांपर्यंत केंद्राने वाढवावी, अशी मागणी केली.

पवार म्हणाले की, ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने साखरेचे दर वाढीस लावले आहेत. महाराष्ट्रातील कारखांदारांनी त्या वातावरणाचा अत्तापासून विचार करावा. यापुढे साखरेबरोबर आता इथेनाॅल, वीजनिर्मितीचे अचूक धोरण कारखानदारांनी राबविले पाहिजे. साखर उत्पादन खर्चाच्या तुलनेत केंद्राने साखरेची किमान आधारभूत किंमत वाढविली नाही. परिणामी कारखानदारांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी व्याजाचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो.

‘माळेगाव कारखाना विरोधकांच्या ताब्यात असताना मोठे अर्थिक नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्याने पहावे लागले. विस्तारीकणात यंत्रसामग्री निकृष्ठ दर्जाची बसविल्याने साखर उतारा घसरला, डिस्टीलरी, विजेचे उत्पन्न घटले, कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्यांना गेली दोन वर्षे कमी दर मिळाला. परंतु बाळासाहेब तावरे यांच्या संचालक मंडळाने मागील दीड वर्षात कर्जाची परतफेड करीत कारखाना सुस्थितीत आणला. त्यामुळे माळेगाव यापुढे ऊस दराच्या बाबतीत सोमेश्वरसह अग्रगण्य ऊसदराची बरोबरी करेल,`` असा विश्वासही पवार यांनी बोलून दाखविला.

माळेगावने पाच कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी प्लॅंट)उभा केला आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये होणारे प्रदुषण थांबविले, अर्थात कारखान्याच्या निवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द खरा केल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले. तत्पूर्वी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी आपल्या भाषणात प्राप्तीकर विभागाच्या नोटीसाचा मुद्दा उपस्थित करीत पवारांचे याकडे लक्ष वेधले. तसेच त्यांनी गतवर्षी विक्रमी १२ लाख ६८ हजार गाळप करून साखर उतारा ११. ७५ टक्के इतका मिळविल्याने पुढील वर्षाची एफआरपी प्रतिटन २ हजार ७८० पर्यंत जाईल, असे सूचित केले.

या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, मदनराव देवकाते, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, केशवराव जगताप, अनिल तावरे, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, कार्य़कारी संचालक राजेंद्र जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले. तानाजी देवकाते यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT