Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : पत्रकारांना ती गोष्ट सांगू नका : शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

सचिन लोंढे

कळस (जि. पुणे) : शेतकरी विविध प्रयोगांतून शेतात वाढीव उत्पन्न घेतो. हीच माहिती ते आनंदात पत्रकारांना देतात. पत्रकारांनी बातमी दिल्यानंतर सरकार म्हणते, शेतकऱ्यांना आता जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्यावर कर बसवा. म्हणून माझा तुम्हाला सल्ला असेल, उत्पन्न मिळवा; पण पत्रकारांना माहिती देताना उत्पन्न सांगू नका, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकऱ्यांना दिला. (Don't tell that story to journalists: Sharad Pawar's advice to farmers)

इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळसच्या गोसावीवाडीतील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या उसाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येथे आले होते. मधुकर खर्चे एकरात शंभर टन आणि ५० ते ६० कांडी असलेल्या उसाचे उत्पादन घेत आहेत. त्या उसाची पाहणी केल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला थेट कार्यक्रमातून मोबाईलव्दारे संपर्क साधून खर्चे यांच्या उसाची पाहणी करून माहिती घेण्याची सूचना केली.

पवार म्हणाले की, साखर उत्पादनात यंदा भारत प्रथम क्रमांकावर आहे. हे स्थान कायम राहण्यासाठी शेतकऱ्यांनी उसाचे एकरी शंभर टन उसाचे उत्पादन घेण्याची गरज आहे. साखर उद्योगात ब्राझील या देशाचा प्रथम क्रमांक असतो. यंदा मात्र भारतानंतर ब्राझील, आस्ट्रेलिया व इतर देशांची क्रमवारी आहे. देशाचा हा क्रमांक कायम राहण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.

कधीकाळी माळरान असलेल्या इंदापूर तालुक्याच्या या भागात नंदनवन फुलल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा उपयोग शेतीत करुन खर्चे यांनी प्रगती साधली आहे. उस उत्पादनाची माहिती नव्या पिढीला आनंदाने देवून तरुण शेतकऱ्यांनाही उत्पादन वाढीस प्रोत्साहित करुन देशात महाराष्ट्राचे नाव अग्रगण्य ठेवण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भरतराजे भोसले, उपसरपंच विशाल राजेभोसले आदी उपस्थित होते. नीलेश खर्चे यांनी स्वागत, तर मधुकर खर्चे यांनी प्रास्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT