Sambhaji Brigade Sarkarnama
पुणे

संभाजी ब्रिगेडचा गनिमी कावा राज्यपालांना समजला अन् ऐनवेळी दौराच केला रद्द

Sambhaji Brigade| Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारी यांच्या रद्द झालेल्या चिंचवड दौऱ्याचा फटका संभाजी ब्रिगेडचे तीन पदाधिकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना बसला आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे रविवारपासून (ता.२७ मार्च) दोन दिवसांच्या पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी सकाळी लोणावळ्यात पुरस्कार वितरण केले. सायंकाळी पुण्यातील कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार आहेत. मात्र, दुपारी नियोजित दौऱ्यातील त्यांचा चिंचवडचा (Chinchwad) पुरस्कार सोहळा अचानक रद्द करण्यात आला. त्यात गोंधळ होण्याची माहिती पोलिसांना (Pimpri Police) मिळाल्याने त्याला राज्यपाल आले नाही, असे समजले. त्यामुळे लोणावळ्यानंतर चिंचवडचा कार्यक्रम न करता राज्यपालांनी थेट पुण्यातील राजभवन (Rajbhavan) गाठले.

दरम्यान, राज्यपाल आले नाही, तरी त्यांच्या या नियोजित व नंतर रद्द झालेल्या चिंचवड दौऱ्याचा फटका संभाजी ब्रिगेडचे तीन पदाधिकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांना बसला. त्यांना दिवसभर पोलिसांच्या नजरकैदेत राहण्याची हकनाक शिक्षा मिळाली. कारण राज्यपालांनी छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या या दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. तर, राज्यपालांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी भापकरांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे भापकरांना सकाळीच पिंपरी ठाण्यात आणून बसविण्यात आले. अशीच कारवाई चिंचवड पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध केली. तत्पूर्वी त्यांना राज्यपालांच्या कार्यक्रमात कसलेही विघ्न न आणण्याची अन्यथा कारवाईचा इशारा देणारी प्रतिबंधात्मक नोटीसही चिंचवड पोलिसांनी काल (ता. 26 मार्च) बजावली होती. चिंचवडच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार होण्याचा अहवाल एलआयबीनेही दिला होता. त्यामुळेच तो रद्द झाल्याचे कळते.

दरम्यान, नजरकैद करणाऱ्या पोलिसांचा व त्यांच्या लोकशाहीविरोधी व हुकूमशाही पद्धतीचा भापकर यांनी निषेध केला. दुपारी दोनच्या चिंचवडच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल हे येणार नाहीत, हे दुपारी तीन वाजता कळले. तरीही पोलिसांनी न सोडल्याने भापकर व काळे यांनी संताप व्यक्त केला. सायंकाळी साडेचार वाजता त्यांची सुटका करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपालांनी जाहीर कार्यक्रमांत अनुचित उदगार काढलेले आहेत. म्हणून त्यांनी आज चिंचवडमध्ये माफी मागावी, अशी मागणी भापकर यांनी केली होती. तर, याच वेळी याच कारणावरून संभाजी ब्रिगेडही काळ्या फिती लावून राज्यपालांचा निषेध करणार होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT