Mangaldas Bandal  Sarkarnama
पुणे

Mangaldas Bandal : मोठी बातमी! मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

Ed Arrest Mangaldas Bandal : 16 तासांहून अधिक चौकशीनंतर मंगलदास बांदल यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

Akshay Sabale

Ed Arrest Mangaldas Bandal Marathi News : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. मंगळवारी 'ईडी'नं बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापे टाकले होते. यानंतर 16 तास चौकशी केल्यानंतर 'ईडी'नं बांदल यांना ताब्यात घेत अटक केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास' ईडी'नं ( ED ) बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाडी (ता.हवेली) येथील निवासस्थानांवर छापे टाकले होते. यावेळी शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी केली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात मंगलदास बांदल यांचीही चौकशी 'ईडी' अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांना बांदल ( Mangaldas Bandal ) यांच्या निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रूपयांची रक्कम, पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किंमतीची चार मनगटी घड्याळे आढळून आली. यानंतर बुधवारी पहाटे सोळा तासांच्या चौकशीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. अधिकारी बांदल यांना मुंबईतील 'ईडी' कार्यालयात घेऊन गेले आहेत.

बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक प्रकरणातील आरोपी आहेत. त्याच प्रकरणी 'ईडी'नं मंगलदास बांदल यांना 'ईडी'नं ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

वंचितकडून उमेदवारी रद्द

लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. पण, बांदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.

वीस महिन्यांनी तुरुंगाबाहेर पण..

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना 26 मे 2021 रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यामुळे बांदल यांना तब्बल वीस महिने तुरुंगात राहावे लागले होते. बांदल यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ते जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आले होते.

विधानसभेसाठी इच्छुक

शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्वाचा राजकीय चेहरा म्हणून बांदल यांची ओळख आहे. लोकसभेनंतर शिरूर-हवेली विधानसभा लढविण्यासाठी सध्या ते इच्छुक होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT