Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Pravin Darekar News : महायुतीकडे मुख्यमंत्रिपदासाठी तीन चेहरे, दरेकर म्हणतात...

Sudesh Mitkar

Pune : महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या दोघांचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते लावत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून टीका करीत मुख्यमंत्रिपद एकच असल्याची आठवण करून दिली जात आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदावरून होणाऱ्या टीकेला भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महायुतीकडे मुख्यमंत्रिपदासाठी तीन तीन उमेदवार आहेत. आमच्याकडे तीन-तीन मुख्यमंत्री ठरले आहेत. मात्र, तुमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच नाही, असा टोला महाविकास आघाडीला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. महायुतीतील शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिन्ही पक्ष महायुती म्हणून आगामी निवडणुकांना सामोरे जाणारा असून प्रत्येक पक्ष आपापल्या पातळी संघटन मजबूत करण्यासाठी काम करीत आहे. प्रत्येक पक्ष आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर तिन्ही पक्ष चर्चेने आणि समन्वय साधून महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवेल, असे दरेकर म्हणाले.

नुकत्याच एका सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. त्यावरदेखील दरेकर यांनी भाष्य केले. आम्ही सर्व्हेचा सन्मान करतो. मात्र, आगामी लोकसभेबाबत कोणतेही सर्व्हे आले तरी देशामध्ये मोदींची हवा आहे. त्यांच्यापुढे कोणतेही सर्व्हे टिकणार नाहीत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला वेगळी अशी तयारी करण्याची गरज नाही. भाजप 24 तास इलेक्शन मोडमध्ये असते. इतर पक्षाप्रमाणे पावसाळा आला की छत्र्या उघडा असं आमचं काम नसतं, असे म्हणत दरेकरांनी यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. आगामी निवडणुकीत मोदी नावाच्या वादळात कोणी टिकणार नाही. आम्ही ४०० जागांचा टप्पा मारू करू, असा विश्वास व्यक्त करत ४०० पार तिसरी बार मोदी सरकार, हे ध्येय घेऊन पुढे जात आहोत, असे दरेकर म्हणाले.

संजय राऊत यांनी राम मंदिराचा प्रोग्राम भाजपने हायजॅक केलाय, अशी टीका केली होती. राऊतांच्या या वक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला. आम्ही त्यांच्या बोलण्याला फारशी किंमत देत नाही. त्यांच्याकडे आता आरोप करायला काहीच नाही. प्रभू श्रीराम हे पूर्ण देशाचे दैवत आहेत. कमीत कमी चांगल्या कामात टीकाटिप्पणी नको, असे दरेकर म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT