Eknath Shinde-vijay shivtare Sarkarnama
पुणे

सासवडच्या पालखीतळावर दिलेला शब्द एकनाथ शिंदेंनी पाळला; ‘उपसा सिंचन’च्या वीजदरात कपात

उपसा सिंचन योजनांचा बेसुमार वाढलेला वीजदर कमी करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या १९ टक्के रकमेत पाणी द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. शिंदे यांनी उपसा योजनेचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते.

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (जि. पुणे) : सासवडच्या पालखीतळ मैदानावर पुरंदरवासियांच्या साक्षीने राज्यातील जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाळला. उपसा सिंचन योजनांचा (Upsa Irrigation Scheme) बेसुमार वाढलेला वीजदर कमी करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या १९ टक्के रकमेत पाणी द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay shivtare) यांनी सासवड येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी मान्य करत उपसा योजनेचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत शासकीय आदेश काढत वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय जारी केला आहे. (Eknath Shinde kept his word; Big reduction in electricity Rate of Upsa Irrigation Scheme)

याबाबत आज (ता. २९ ऑगस्ट) माजी राज्यमंत्री शिवतारे यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशी, आंबोडी, सिंगापूर, वनपुरी, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, पारगाव, खानवडी, राजेवाडी, टेकवडी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, बेलसर, माळशिरस, मावडी, पिंपरी, पिसर्वे, नायगाव, कोथळे, रानमळा, पांडेश्वर, रोमनवाडी, अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी उपसा सिंचन योजनांचा वीजदर १ रुपये १६ पैसे प्रतियुनिट करून अवघ्या १९ टक्के दरात राज्यभरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते. शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीची उर्वरित ८१ टक्के रक्कम शिवतारे यांनी राज्यातील कारखान्यांवर लादली होती. मात्र, पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वीजदर १.१६ वरून ३ रुपये ६९ पैसे इतका वाढवला होता.

जुन्या दराने शेतकऱ्यांना प्रति दशलक्ष घनफूट पाण्यासाठी साधारणतः १२ हजार रुपये खर्च येत होता. पण, अचानक वीजदरात केलेल्या वाढीमुळे हा खर्च ३३ हजार रुपये प्रति दशलक्ष घनफूट पर्यंत गेला होता. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यकाळात झालेली ही वाढ आता शिंदे सरकारने रद्द करून पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे., असे शिवतरे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

‘खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार’

वीजदर पूर्ववत केल्यानंतर पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण होते. याबाबत बोलताना वाघापूर येथील ॲड. नितीन कुंजीर म्हणाले की, शिवतारे यांच्या मागणीला उचलून धरत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा या भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे. शिंदे सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे, हेच यातून दिसून आले आहे. माजी सभापती अतुल मस्के, माजी उपसभापती दत्तात्रेय काळे गोरक्षनाथ माने, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मानिक निंबाळकर आदींसह अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT