Eknath Shinde shivsena Sarkarnama
पुणे

Junnar and Khed-Alandi Constituency : जुन्नर, खेड-आळंदी मतदारसंघावर शिवसेनेचा दावा? ; प्रभारी अन् निरिक्षकांचीही केली नियुक्ती!

गणेश कोरे

Eknath Shinde Shivsena and Junnar and Khed-Alandi Constituency : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघडम वाजू लागले आहेत. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अद्याप सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचेही जागा वाटप निश्चित झालेले नाही.

परंतु आतापासून मतदारसंघावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दावा केला जात असल्याचे विविध राजकीय पक्षांच्या कृतीतून दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता जुन्नर आणि खेड-आळंदी या मतादारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा दिसून येत आहे.

कारण, प्रथमच विधानसभेसाठी सज्ज झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने जुन्नर आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून किरण पावसकर आणि निरिक्षक म्हणून नाना भानगिरे (खेड - आळंदी) आणि बाबा हांडे (जुन्नर) यांची नियुक्ती केली आहे. मात्र या नियुक्त्या करत असताना पक्षाने जिल्हाप्रमुख शरद सोनवणे (जुन्नर) आणि भगवान पोखरकर (खेड) यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली नसल्याबद्दल आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे.

शिवसेना शिंदे गटाने 133 मतदारसंघासाठी निरिक्षक आणि 93 मतदारसंघावर निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि खेड - आळंदी या मतदारसंघासाठी निरिक्षक आणि प्रभारी नियुक्तीमुळे या दोन मतदारसंघावर दावा केले असल्याचे बोलले जात आहे.

खेड-आळंदी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) गटाचे बाबाजी काळे यांनी विविध कार्यक्रमांद्वारे स्वतः इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून अतुल देशमुख स्वतःला अजमावत आहेत.

याशिवाय जुन्नर विधानसभा मतदारसंघातुन जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे इच्छुक असून, त्यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. सोनवणे यांनी गोद्रे गावात जगातील सर्वांत उंच शिवाजी महारांच्या पुतळ्याचे स्मारक आणि सुवर्णमंदिराची घोषणा केली असून, त्याचे काम सुरू केल्याने सोनवणे यांची मोठी चर्चा समाजमाध्यमांसह जनमानसांत आहे.

मात्र महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यमान आमदार अतुल बेनके असून, महायुतीच्या वाटपात नैसर्गिक न्याय तत्वाने ही जागा राष्ट्रवादीला जाणार असल्याने शरद सोनवणे यांनी एकला चलो ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सोनवणे यांच्या गावभेट दौऱ्यांच्या प्रसिद्धी पत्रकावर शिवसेना आणि धनुष्यबाणाचे चिन्ह नसल्याने त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT