Haveli News: आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून गणल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिकच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी रविवार (ता. १२) दुपारी निसर्ग मंगल कार्यालय गुलटेकडी पुणे येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) करणार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये गारटकर (Pradeep Garatkar) म्हणाले, "हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक साधारणपणे १८ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २९ एप्रिल २०२३ मध्ये होत आहे. हवेली तालुक्याची बाजार समिती असली तरी पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच संपूर्ण जिल्ह्याची मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणीच होत असते. यामुळे सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे."
यानंतर थेऊर कारखाना बंद असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून इच्छुकांची संख्याही मोठी असल्याचे गारटकरांनी सांगितले. ते म्हणाले, "राजकारणातील ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही पिढ्या बाजार समितीची निवडणुकीसाठी थांबलेले आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच याच तालुक्यातील थेऊर सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे सहकारातील अनेक कार्यकर्त्यांची काम करण्याची संधी हुकलेली आहे. तसे पाहिले तर हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे."
या मेळावा बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, सहकार क्षेत्रातील प्रमुख, तसेच पुणे जिल्हा बँकेचे, दूध संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर-हवेली, पुरंदर-हवेली, खडकवासला-हवेली तालुकाध्यक्ष आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार आहेत. ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे रविवारी होत असलेला मेळावा हवेली तालुक्याच्या राजकीय घडामोडीस दिशा देणारा ठरणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी सांगितले.
दरम्यान, हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे (NCP) दोन गट असून दोन्ही गटाबाबत अजित पवार काय भूमिका मांडणार? कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे मेळाव्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
१८ वर्षे का रखडली निवडणूक ?
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक तब्बल १८ वर्षांनी होत आहे. निवडणूक रखडण्यामागे या बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळामध्ये एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, न्यायालयामध्ये वाद, राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे, यातून हवेली बाजार समितीचे संचालक बोर्ड बरखास्त करण्यात आले. ही संस्था हवेली तालुक्यापुरतीच ठेवायची का? पुणे जिल्ह्यात पुरती मर्यादित ठेवायची? त्याला राज्यस्तरीय दर्जा द्यायचा का? राज्यस्तरावर निवडणूक घ्यायची तसेच अनेक लोक यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते अजूनही आहेत. शेवटी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, बाजार समितीची निवडणूक ही, २९ एप्रिल २०२३ रोजी घेणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक होतआहे.
किती मतदार ?
आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती साठी १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी सोसायटी मधून ११ जागांसाठी एक हजार ६५५ मतदार, ग्रामपंचायतमधून चार जागांसाठी ७१३ मतदार, व्यापारीमधून दोन जागांसाठी १३ हजार १७० मतदार तर कामगार हमाल मापाडीमधून एका जागेसाठी एक हजार ७८० मतदार असणार आहेत.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, हवेली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.