Congress News Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड काँग्रेसमधील गटबाजी उफाळली; शहराध्यक्ष कदमांच्या राजीनाम्याची मागणी

Congress News: पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्याकडे दोन पदे असल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

उत्तम कुटे

Pimpri News: एक व्यक्ती, एक पद असा ठराव काँग्रेसने त्यांच्या राज्यस्थानात उदयपूर येथे गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या राष्ट्रीय शिबिरात संमत केला आहे. तरीही पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्याकडे इतर दोन पदे असल्याने त्याला शहरातील बहुतांश आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देऊन हा नियम कदम यांना लागू होत नाही का, त्यांना प्रदेश काँग्रेसचा, तेथील नेत्यांचा आशीर्वाद आहे का, अशी कडक विचारणा त्यांनी केली आहे. यातून अगोदरच खिळखिळ्या झालेल्या शहर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा जोरदारपणे उफाळली असून, स्थानिक नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अगोदरचे दोन टर्मचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून आणि वरिष्ठांकडून डावलले जात असल्याने २६ वर्षे पक्षात काम केल्यानंतर ११ नोव्हेंबर २०२० रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यापदी ११ महिने कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. अखेर ७ ऑक्टोबर २०२१ रोजी कदम यांची नेमणूक झाली. नंतर त्यांनी आपली कार्यकारिणी प्रदेशला पाठवली.

पण, तिला अद्याप मंजुरीच देण्यात आलेली नाही. त्याला कारण कदम यांना असलेला विरोध असल्याचे सांगण्यात य़ेत आहे. त्यांच्याकडे अध्यक्षांखेरीज इतर दोन पदे असल्याने पक्ष धोरणाच्या विरोधात असल्याने त्याला पक्षातूनच हरकत घेण्यात आली आहे. त्यांच्या या हरकतीचे पत्र जोरात व्हायरल झाले असून, ते 'सरकारनामा'च्याही हाती लागले आहे.

नुकतेच पुणे दौऱ्यावर आलेल्या पटोलेंवर उद्योगनगरीतील काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अशा वीसपेक्षा अधिक जणांनी हा लेटर बॉम्ब आठ तारखेला टाकला. त्यातील काहींशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला. तसेच आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी शहराध्यक्ष कदमांना एक महिन्याची मुदत दिली आहे, असे या पत्रावर सही केलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.

कदम यांच्याकडे पक्षाशी संलग्न इंटकचे राष्ट्रीय सचिव तसेच पुणे जिल्हाध्यक्ष अशी दोन पदे आहेत. त्यांचा राजीनामा दिला, तर त्यांच्या कार्यकारिणीवरून सिग्नल मिळेल, असेही सांगण्यात येत आहे, तर कदम यांनाच अध्यक्षपदावरून दूर करावे, अशी मागणी या पत्राद्धारे पटोलेंकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, यासंदर्भात कदम यांचे म्हणणे काय आहे ते ऐकून घेण्यासाठी त्यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही, तर त्यांच्याकडे पक्षाचे एकच पद असून, इतर दोन पदांचा पक्षाशी काहीही सबंध नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

इतर दोन पदे ही पक्षाशी संलग्न कामगार संघटनेची असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे लोकसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणूक होणार असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी हे कदमांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी दिसते आहे. त्यात त्यांच्या या पदाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, एक वर्ष ते राहिल्याचे कारण त्यासाठी दिले जाऊ शकते.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT