Sanjay Jagtap Congress  sarkarnama
पुणे

Fake Signature Scam: काँग्रेसच्या माजी आमदारांची बनावट स्वाक्षऱ्या करून तब्बल 30 कोटींची फसवणूक; थेट बंगला जप्तीची नोटीस

Sanjay Jagtap Congress : संजय जगताप यांच्या कंपनीच्या संचालकांना कर्ज न फेडल्याची नोटीस पाठविण्यात आली. यामध्ये तारण ठेवलेली संपत्ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला होता.

Sudesh Mitkar

Pune News : काँग्रेसचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबीयांची व त्यांच्या कंपनीतील संचालकांची बनावट स्वाक्षरी करून तब्बल 30 कोटी रुपयांचे बनावट कर्ज प्रकरण करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका खासगी वित्तीय संस्थेतील अधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजवर्धिनी संजय जगताप (वय 43, रा. सासवड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, 2011 साली व्यावसायिक कामासाठी एका खासगी वित्तीय संस्थेकडून त्यांनी ३० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2018 पर्यंत त्यांनी संपूर्ण कर्जाची परतफेडही केली. त्यानंतर संबंधित वित्तीय संस्था दुसऱ्या कंपनीत विलीन झाली. विशेष म्हणजे, या संस्थेतील काही कर्मचारी विलीन झालेल्या कंपनीत रुजू झाले.

संपत्ती जप्त करण्याची नोटीस

दरम्यान, 2023 मध्ये जगताप यांच्या कंपनीच्या संचालकांना कर्ज न फेडल्याची नोटीस पाठविण्यात आली. यामध्ये तारण ठेवलेली संपत्ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.

बनावट कागदपत्रांद्वारे त्यांच्या कुटुंबातील सदस्य व संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून नव्याने कर्ज वितरण दाखवण्यात आले होते. या कर्जाचे कोणतेही व्यवहार प्रत्यक्षात झालेले नाहीत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणात पोलिसांनी तक्रार अर्जाची प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींनी तीन बँक खात्यांवर एकूण 30 कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाल्याचे दाखवून बनावट दस्तऐवज तयार केले, असा आरोप आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT