Maharashtra Farmer Loan Waiver; cm devendra fadnavis And Dattatray Bharne sarkarnama
पुणे

Farm Loan Waiver : कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ होणार अन् किती पैसे खात्यात जमा होणार कृषिमंत्र्यांनी थेट आकडाच सांगितला

Agriculture Minister Farmer Relief Package : कर्जमाफी योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार याबाबत कृषिमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असतानाच, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुण्यात किती कोटींचा कर्ज माफ होणार आहे आणि किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल याची आकडेवारीच मांडली आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले, या योजनेवरून विरोधकांकडून जरी फसवेगिरीचे आरोप होत असले तरी वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या कर्जमाफी योजनेचा अंदाज पाहिला तर राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार असून, त्यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आचारसंहिता लागू असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, मात्र राज्य सरकार आर्थिक अडचणीत असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अटींबाबत शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम किंवा अडचण असल्यास त्या अटींमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, तसेच आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या हमीभावाच्या मागणीबाबत आम्ही पूर्णपणे सहमत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दुसरीकडे, राज्यातील मान्सूनपूर्व आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पेरणी घाईघाईने न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मराठवाडा आणि खान्देश भागात अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी येत्या १२ जून ते १५ जून दरम्यानच्या पावसाचा अचूक अंदाज घेऊनच जमिनीमध्ये पेरणी करावी.

मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून, सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने जळगाव, अमरावती आणि बुलढाणा या भागात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.

या सर्व भागातील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत पोहोचवता येईल. तसेच ही सगळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आगामी कॅबिनेट बैठकीत मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या खत टंचाईच्या चिंतेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्यात युरिया खताचा पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे पुरवठ्यात काही प्रमाणात अडचण नक्कीच निर्माण झाली आहे, परंतु त्याबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे सातत्याने विनंती आणि पाठपुरावा सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलसारखी खतांची टंचाई निर्माण होईल अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगू नये, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.

दरम्यान राज्यसभेच्या जागेवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. भरणे म्हणाले, या बाबतीत सुनेत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य आहे. कारण या संदर्भातील सर्व अधिकार त्यांच्याकडेच सुपूर्द करण्यात आले आहेत. छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ आणि अत्यंत लढवय्ये नेते असून ते अजिबात नाराज नसल्याचे सांगत भरणे यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT