Pune News: विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास काही तास राहिले असतानाच महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी डाव टाकण्याच्या तयारीत आहे.
याचाच भाग म्हणून महाविकास आघाडीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आपल्या सोबत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी भेट घेतल्यानंतर तूपकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पुण्यात आले आहेत. यानंतर त्यांच्या महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या निर्णयाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले, "विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत जावं असं आमच्या राज्यभरातील सहकाऱ्यांचे म्हणणं आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून चर्चा केली आहे. खासदार संजय राऊत यांच्याशी देखील बोलणं झालं यानंतर आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. शरद पवार यांच्याशी आज चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आम्हाला कशा पद्धतीने सामावून घेता याबाबत निर्णय घेतील.
24 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी आम्ही स्वतंत्र अशी तयारी करीत आहोत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील काही जागा लढवण्याची तयारी आम्ही केली आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारे जे तरुण नेते आहेत ज्यांच्या मागे जनाधार आहे. ते विधानसभेत जावेत अशी आमची इच्छा आहे. मी बुलढाणा येथील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी आमच्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नागरिकांची भावना आहे.
सोयाबीन कापसाबाबतच शाश्वत धोरण कशाप्रकारे महाविकास आघाडी आणू शकते. याबाबत कशा प्रकारची निर्णय घेतले जाऊ शकतात, या संदर्भात आज शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चर्चांच्या फेऱ्या सुरू असल्याचं तुपकर यांनी सांगितलं.
तुपकर पुढे म्हणाले ठाकरे यांना सांगितले आहे की आम्ही फरफटत कोणाच्या मागे येणार नाही. आम्हाला सन्मानाने घेतलं तर आम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार आहोत. अन्यथा आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं तुपकर यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.