Pune, 25 May : खडकवासला धरणाचे पाणी इंदापूरला न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील सिंचन भवनासमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव तथा पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणेही सहभागी होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती अंकिता पाटील यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून खडकवाला प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करत आहेत.
दरम्यान, अधिकाऱ्यांकडून फुरसुंगी येथील कालवा फुटण्याचे कारण देऊन एक हजार क्युसेकने पाणी सोडले जात असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे जलसंपदा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन पाणी विकल्याचा आरोप इंदापुरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे इंदापूरला पाणी न मिळण्याचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
खडकवासला धरणातून इंदापूरला टेलपर्यंत पाणी सोडले जाते. पण, यावेळी उन्हाळी आवर्तन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेच नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यातूनच आज सिंचन भवनासमोर ठिय्या मांडला आहे. वास्तविक प्रत्येक आवर्तनावेळी १३०० क्युसेकने कालव्यातून पाणी सोडले जाते, पण या वेळी फुरसुंगीत कालावा फुटण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून १००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे, त्यामुळे पाणी पुढे सरकण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात आंदोलनात सहभागी झालेले इंदापूर पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे इंदापूरला पाणी मिळू शकलेले नाही. आमच्या हक्काचं पाणी इंदापूरपर्यंत पोचलेले नाही. अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही पाणी सोडलं गेलं नाही. फुरसंगीत कालवा फुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्ही १३०० क्युसेकने पाणी सोडू शकत नाही, त्याऐवजी आम्ही १००० क्युसेकने पाणी सोडले आहे, असे अधिकारी सांगत आहेत, त्यामुळेच इंदापुरात पाणी येत नाही.
वडिल मंत्री असूनही पाणी येत नाही; मग इंदापूरच्या वाट्याचं पाणी कुठं जातंय?, यावर श्रीराज भरणे म्हणाले, आमचं शेतकरी कुटुंब आहे. त्या हक्कासाठी मी आज आलो आहे. मी पंचायत समितीचा सदस्य आहे, त्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात होतो. देशमुख यांच्या संपर्कात मी होतो, ते मला फक्त एकच फोटो पाठवायचे. फुरसुंगीत एवढा कचरा साठला आहे, एवढंच ते मला सांगायचे. पण त्यांनी नियोजन का केलं नाही, त्यांनी कालव्याची स्वच्छता का केली नाही, हे विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र जमलो आहेात.
मंत्री दत्तात्रेय भरणे हे आता जलसंपदा विभागाचे देशमुख यांच्या भेटीसाठी आले आहेत. उद्या आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो आहोत, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी अभियंत्याच्या चुकीमुळे, तसेच कुणाचे तरी प्यादे बनून काम केल्यामुळे इंदापूरला जाणीवपूर्वक पाणी दिलेले नाही. दौंड, बारामतीला पाणी मिळते पण इंदापूरला तालुक्याला का नाही? या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.