

Mangalvedha, 24 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोलापूर विधान परिषद मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहातून माझे नाव पुढे आले आहे; परंतु पक्षाने मला संधी दिली तर मी लढण्यास तयार आहे. माझ्या उमेदवारीबाबतचा सर्वस्वी निर्णय पक्षाचे नेते घेतील, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (पूर्व विभाग) शशिकांत चव्हाण यांनी मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. २५ मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी गेली आठवडाभरापासून अनेक नावे चर्चेत आली आहेत, त्यात पक्षाचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत कामाच्या आणि निष्ठेच्या जोरावर मजल मारणारे शशिकांत चव्हाण यांच्याही नावाचा समावेश आहे.
सध्या बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासह शशिकांत चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे. पण आगामी 2029 मधील विधानसभा निवडणुका आणि त्यावेळीची संभाव्य राजकीय गणिते याचा ठोकताळा मांडूनच पक्षाकडून उमेवारीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चळवळीतून पुढे आलेले चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षसंघटनेतील माझ्या कामाची दखल घेऊन भाजपने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तो निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याची भूमिका पार पाडली त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झालो. पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी यशस्वीपणे पार पाडली आहे.
भारतीय जनता पक्षाने विधान परिषद जागेसाठी माझा विचार केला तर ती जबाबदारीही मी प्रामाणिकपणे पार पाडून जिल्ह्यातील अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सन्मान व प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची माझी भूमिका राहणार आहे. मात्र याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा राहील. कारण पक्षाशी झटणाऱ्या कार्यकर्त्याची दखल घेतली जाते, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.