Crime Sarkarnama
पुणे

धक्कादायक! पोलिस ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण

उषा अनारसे यांच्या फिर्यादीनुसार सुरेखा तायडे हिच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड पोलिस (Pune Police) ठाण्यात वाद घालणाऱ्या सासू व सुनेला शांत करण्यास गेलेल्या महिला पोलिस नाईक यांना सासूने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात शासकीय कामात अडथळा व दुखापत केल्याबद्दल गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक कक्षाला लागून असलेल्या ठाणे अंमलदार कक्षात काल (ता.२७ एप्रिल) दुपारी हा प्रकार घडला. सुरेखा बळीराम तायडे (वय ४३, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, बंगला साइड, दौंड) या त्यांची सून नयन गिरीश तायडे (वय २८, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) या दोघी ठाणे अंमलदार कक्षात आपसात जोरात वाद घालत होत्या. दोघींचा गोंधळ वाढल्याने ठाणे अंमलदार यांनी पोलिस नाईक उषा हनुमंत अनारसे यांना दोघींचे भांडण सोडविण्यास सांगितले. उषा अनारसे या त्यांना समजावून सांगत असताना सुरेखा तायडे या महिलेने त्यांच्या अंगावर धावून जात गळ्यास बोचकरले. त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता सुरेखा तायडे हिने त्यांच्या तोंडात दोन चापटी मारत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी उषा अनारसे यांच्या फिर्यादीनुसार सुरेखा तायडे हिच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३५३ (लोकसेवकास कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी फौजदारीपात्र बलप्रयोग करणे), ३२३ (इच्छापूर्वक दुखापत पोचविणे), ३३२ (लोकसेवकाला इच्छपूर्वक दुखापत पोचविणे), ५०४ ( शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे) व ५०६ ( फौजदारीपात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दौंड पोलिस ठाण्याच्या दारात मटका जुगार प्रकरणातील सराईत आरोपींचे छायाचित्र असलेले मोठे शुभेच्छा फलक लावण्यात आले असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याने पोलिसांवर पोलिस ठाण्यातच हात उचलण्यापर्यंत मजल गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT