Pimpri-Chinchwad Municipal Corporation Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad: पिंपरी महापालिकेत चाललंय काय? तीन महिन्यात तीन लाचखोरांसह पाच कर्मचारी झाले निलंबित

Pimpri-Chinchwad Municipal Corporation: पिंपरी महापालिकेचे उशीराचे शहाणपण, 'त्या' दुसऱ्या लाचखोर कर्मचाऱ्यालाही बसवले घरी

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोरीचा गेल्या चार महिन्यातील तिसरा ट्रॅप या महिन्यात सात जूनला झाला. त्यात उद्यान विभागातील सहाय्यक निरीक्षक किरण अर्जून मांजरे (वय ४६) याला त्याच्या कार्यालयातच १७ हजार रुपयांची लाच घेताना ७ जूनला पकडण्यात आले होते. त्या गुन्ह्यात त्याला ४८ तास पोलीस कोठडीत रहावे लागल्यामुळे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी त्याला १४ जूनला सेवेतून निलंबित केले.

मात्र, या लाचखोरीच्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी आणि ४८ तास म्हणजे दोन दिवस एसीबी पोलीस कोठडीत राहिलेला उद्यान विभागाचा उपलेखापाल संजय देवराम काळभोर (वय ५६) याचे निलंबन आयुक्तांनी मांजरेबरोबर केले नव्हते. त्याला ८ जूनला अटक झाली होती. तो ही मांजरेबरोबर ४८ तासांपेक्षा अधिक काळ एसीबी कोठडीत राहिला होता. मात्र, निलंबन एकाचेच (मांजरे) झाल्याने या कारवाईची पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

त्याबाबत 'सरकारनामा'ने १४ जून रोजी 'लाचखोरीत अटक दोघांना; मात्र, आयुक्तांनी निलंबन केले एकाचेच' या मथळ्याखाली बातमी दिली. त्याचा परिणाम झाला. प्रशासनाने दखल घेतली. या बातमीमुळे ते हालले आणि मांजरेला लाच घेण्यास प्रवृत्त करणारा काळभोरलाही घरी बसवले. त्याच्या निलंबनाचा आदेश पालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी गुरवारी (ता.२२) काढला.

दरम्यान, पिंपरी महापालिकेचा आणखी एक भ्रष्ट कर्मचारी (लिपिक) दत्तात्रेय विठ्ठल पारधी याला काल (ता.२३) आयुक्तांनी निलंबित केले. त्याच्याकडे मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मानधन काढण्याचे काम होते. ते करताना त्याने सप्टेबर २०२० ते मार्च २०२३ दरम्यान पालिका सेवेत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्याही नावे मानधन काढून १६ लाख १० हजार ९२९ रुपयांचा अपहार करून पालिकेची फसवणूक केली. तीन महिन्यानंतर ही फसवणूक पालिकेला समजली होती. गेल्या तीन महिन्यात निलंबित झालेला तो पालिकेचा पाचवा कर्मचारी आहे.

याअगोदर २१ मार्चला एक लाख रुपयांची लाच घेताना पुणे एसीबीने पकडलेला पिंपरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिक दिलीप भावसिंग आडे याला २५ मार्च रोजी आयुक्तांनी घरचा रस्ता दाखवला होता. पाणीपुरवठा विभागात देखभाल, दुरुस्तीचे काम करणाऱ्या ३४ वर्षीय ठेकेदाराच्या कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी त्याने ही लाच घेतली होती.

तर, फसवणुकीच्या गुन्ह्यात तळेगाव दाभाडे पोलिसांनी पकडलेला पालिकेचा सफाई कामगार सचिन आनंदा डोळस यालाही आयुक्तांनी त्याच दिवशी घरी बसवले होते. एका दिवसात दोन कर्मचारी निलंबित झाल्याने पिंपरी महापालिकेची मोठी नामुष्की त्य़ावेळी झाली होती. त्यातून सावरायच्या आत वा बोध घेण्याऐवजी पालिकेतील लाचखोरी आणि त्यातून होणारे निलंबन पुढे सुरुच राहिले. पालिकेच्या उद्यानांच्या देखभालीचे काम केलेल्या तरुण ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरेने १७ हजाराची ७ जूनला लाच घेतली. त्याची परिणती त्याच्या निलंबनात नंतर झाली.

प्रशासकीय राजवट आल्यानंतर एसीबीचे पिंपरी पालिकेतील ट्रॅप आणि त्यातून कर्मचाऱ्यांचे निलंबनही वाढले आहे. गेल्या चार महिन्यात पिंपरी महापालिकेत एसीबीचे तीन ट्रॅप झाले आहेत. त्यातून प्रशासक शेखरसिंह यांचा आपले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे याअगोदर स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरणात १८ ऑगस्ट २०२१ ला लाच घेताना पकडले गेल्यानंतर निलंबित झालेले चार पालिका कर्मचारी पुन्हा पालिका सेवेत रुजू झाले आहेत. त्यातून लाच घेतली, तरी सहा महिने निम्मा पगार काम न करता घरबसल्या (निलंबन काळात) घेऊन पुन्हा कामावर हजर होता येते, हा संदेश गेल्याने पालिकेतील लाचखोरी थांबलेली नाही. तर, त्यानंतर उलट वाढतच चालली आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT