Wakad Flakes
Wakad Flakes Sarkarnama
पुणे

वाकडमध्ये पुन्हा झळकले फ्लेक्स : होय, मी रस्ता बोलतोय !

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : तीन वर्षापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC)आयटीयन्स (IT Campus) राहत असलेल्या पिंपळे -सौदागर (Pimple Saudagar) या आलिशान भागात `Shivade,iam sorry`असे तब्बल तीनशे फ्लेक्स लागल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती. एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची समजूत काढण्यासाठी ही अभिनव शक्कल लढविल्याचे वाकड पोलिसांच्या तपासात नंतर निष्पन्न झाले होते. त्यानंतर आयटीयन्स राहत असलेल्या भागातच वाकडला 'आता नागरिकांची (Corporator) एकच मागणी, रस्ता व नगरसेवक दोन्ही नवीन हवा, होय, मी रस्ता बोलतोय' असे पाचशे फ्लेक्स नुकतेच लागल्याने फ्लेक्सपुराण पुन्हा चर्चेत आले आहेत.

पिंपरी-चिंचवड, पुण्यासह राज्यातील आगामी महापालिका निवडणूक (Municipal Election) ही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शहरात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान नगरसेवकच नाही, तर त्यांचे संपूर्ण कुटंबच सध्या अधिक सक्रिय झाले आहे. त्यातून त्यांनी एकप्रकारे प्रचारास सुरूवातच केल्याचे बोलले जात आहे. अजून आरक्षण सोडत बाकी असल्याने प्रभागाचे आरक्षण कसे पडते, हे अद्याप गुपित आहे. मात्र, चार महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीची तयारी विद्यमान नगरसेवकांबरोबर इच्छूकांनीही सुरू केल्याचे फ्लेक्सबाजीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच, आगामी निवडणूकीत प्रचाराची राळ ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यातच पुन्हा रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेतचा सहभाग असलेल्या प्रभाग २५ मध्ये हे फ्लेक्स लागले आहेत. याव्दारे प्रभागातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चारही नगरसेवकांना आव्हान देण्यात आले आहे. तेथे शिवसेनेचे तीन तर, राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. त्यांना या फ्लेक्समधून भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी आव्हान दिले आहे. गतवेळी (२०१७) ते या प्रभागातील शिवसेना नगरसेवक राहूल कलाटे यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यांच्यासह या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे या दोघांनाही या फ्लेक्समधून आव्हान दिले असल्याचे वाकडकर यांनी 'सरकारनामाला' सांगितले. आपणच वाकडमध्ये हे पाचशे फ्लेक्स लावलेत. त्याला परवानगी मिळाली नसती, म्हणून ते विनापरवानगीने लावल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही फ्लेक्स पालिका प्रशासनाने लगेच काढून टाकले आहे. प्रभागातील दोन्ही स्थानिक आणि चुलत बंधू नगरसेवक कलाटेंवर आरोप करताना वाकडकर म्हणाले, गेल्या साडे चार वर्षात दोन्ही कलाटेंनी वाकडमधील रहिवाशांना वाऱ्यावरच सोडले आहे. एकही आरक्षणाची जागा त्यांनी विकसित केली नाही. त्यामुळे मंडईसारख्या सर्वसामान्यांच्या गरजेचा एक विषय सुद्धा होऊ शकला नाही. तसेच, रस्ते बांधणीत अडथळे आणले, असा आरोप वराडकर यांनी केले. दरम्यान, यासंदर्भात कलाटे बंधूंशी संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT