Baburao Pacharne | BJP Sarkarnama
पुणे

Baburao Pacharne : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

Baburao Pacharne | BJP : त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते.

सरकारनामा ब्युरो

(Bjp MLA Baburao Pacharne passed away)

पुणे : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज (गुरुवार) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी १ ते ३ या दरम्यान त्यांचे पार्थिव बाबूराव नगर येथील पाचर्णे रेस्टहाउसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून सायंकाळी ४ वाजता तर्डोबाचीवाडी येथील शिवतारा कृषि पर्यटन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Bjp MLA Baburao Pacharne passed away)

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच पाचर्णे यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले. परंतू दीड वर्षांच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

तालुक्यातील तर्डोबाची वाडी या एका छोट्याशा वाडीत शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या बाबुराव पाचर्णे यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, राजकारणात कुणीही मार्गदर्शक नसताना गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली. १९७८ साली ते शिरूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. १९८४ पर्यंत ते ते ग्रामपंचायत सदस्य होते. पुढे, शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवित त्यांनी तालुका पातळीवरील राजकारणात प्रवेश केला.

१९८५ ते १९९३ असे सलग आठ वर्षे पाचर्णे बाजार समितीचे सभापती होते. या काळात त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. भव्य व्यापारी संकुल उभारुन शेतकऱ्यांच्या मुलांना विविध व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून दिले. १९९३ ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत ते पुन्हा संचालक म्हणून निवडून आले. तत्पूर्वी, १९९२ च्या पंचायत समिती निवडणूकीत देखील ते विजयी झाले. ते सभापतीपदाचे दावेदार मानले जात असतानाच राजकीय तडजोडीत त्यांची संधी हुकली.

बाबुराव पाचर्णे यांनी १९९५ ला अपक्ष म्हणून प्रथम विधानसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी जवळपास निश्चीत झालेली कॉंग्रेसची उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने त्यांना कोणत्याही पक्षाची मदत मिळाली नाही. मात्र त्यांनी तगडे आव्हान उभे केले होते. त्या निवडणुकीत केवळ ६७८ मतांनी त्यांचा पराभव झाला. १९९७ ते ९९ दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. १९९९ ची निवडणूक त्यांनी कॉंग्रेसकडून लढविली, मात्र त्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले नाही.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पाचर्णे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदा विधनासभा गाठली. २००९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढविली आणि तेथेही त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा स्वगृही परतले आणि पुन्हा यश खेचून आणले. राजकीय कारकिर्दीतील शेवटच्या ठरलेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीतही त्यांना अपशाचेच तोंड पहावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT