Bjp News : गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) जोरात सुरु झालेले इनकमिंग, आऊटगोईंग नंतर ही निवडणूक लांबल्याने थांबले होते. आता चिंचवडच्या पोटनिवडकीनिमित्त ते पुन्हा सुरु झाले आहे. फक्त त्याचा प्रवास तूर्त उलटा आहे.
गतवर्षीच्या मध्यापर्यंत राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) समावेश असलेली महाविकास आघाडी सत्तेत होती. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग त्यावेळी सुरु होते. आता राज्यात सत्ताबदल होऊन विरोधी बाकावरील भाजप हा पुन्हा सत्तेत आल्याने आता इनकमिंगचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. आता ते भाजपमध्ये होत आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना आज आकुर्डी येथे प्रवेश केला. भाजपचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस आणि पक्षाच्या युवा वॉरिअर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
ओव्हाळ हे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याने त्या पक्षाला धक्का बसल्याचा दावा या प्रवेशानंतर भाजपने केला. तसेच त्यामुळे चिंचवड मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून, किवळे-रावेत-पुनावळे या ओव्हाळ यांच्या भागात पक्षाला मताधिक्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओव्हाळ यांनी गत विधानसभेला २०१९ ला पिंपरी या राखीव विधानसभा मतदारसंघातून लढण्याची जोरदार तयारी सुरु केली होती.
पण, त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, अशी विचारणा 'सरकारनामा'ने केली असता आमच्या भागाच्या म्हणजे पुनावळेच्या विकासाकरिता भाजपमध्ये गेलो आहे, असे ओव्हाळ म्हणाले. केंद्रासह राज्यातही भाजप सत्तेत असल्याने विकास हा मुद्दा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अजित दादांवर अजिबात नाराज नसून त्यांना आयुष्यभर विसरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीसमोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आव्हान उभे केले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने आज (ता.१६) कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यामुळे राष्ट्रवादीला आज दुहेरी धक्का बसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.