Vivek Kamble Pass Away : Sarkarnama
पुणे

Vivek Kamble Pass Away : माजी महापौर 'पँथर' विवेक कांबळे यांचे निधन!

Chetan Zadpe

Sangli News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष, माजी महापौर विवेक आप्पा कांबळे (वय ६७) यांचे पुणे येथे आज सकाळी निधन झाले. मागील महिन्यात १६ नोव्हेंबरला सकाळी फिरण्यासाठी गेले असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकीमुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

विविके कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील लढाऊ अभ्यासू नेता हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, बहीण, भावंडे असा मोठा परिवार आहे. रात्री उशिरा येथील कृष्णाघाटावर अंत्यसंस्कार झाले. रविवारी (ता. १७) जलदान विधी आहे. (Latest Marathi News)

विवेक कांबळे यांचे वडील आप्पा रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तर आई हौसाबाई यांनी मोलमजुरी करून चार मुली आणि चार मुलांचा संसार उभा केला. हलाखीच्या परिस्थितीमुळे विवेक कांबळे यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र शालेय वयात ते आंबेडकरी चळवळीत सहभागी झाले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते विविध आंदोलनात सक्रिय होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

१९७२ च्या दुष्काळात त्यांनी दलित कुटुंबांना रोजगार हमीची कामे मिळवताना शासनस्तरावर संघर्ष केला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत पश्‍चिम महाराष्ट्रातून ते शेकडो कार्यकर्त्यांसह वेळोवेळी सहभागी झाले. भारतीय दलित पँथरचे जिल्ह्याचे संस्थापक-अध्यक्ष होते. आंबेडकरी चळवळीत त्यांनी नेहमीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व मानून काम केले. सुरवातीच्या काळात दलित पँथरच्या चळवळीत ते जिल्ह्यात अग्रणी होते. आक्रमक वक्तृत्त्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी गावागावांत पक्षाच्या शाखा काढल्या.

एकीकडे पक्षीय पातळीवर काम करताना त्यांनी मिरज नगरपालिकेतही प्रवेश करीत, निवडणुका जिंकत यशस्वी राजकारण केले. नगरपालिका ते महापालिका या काळात त्यांना सात वेळा प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. नेते मदन पाटील यांनी त्यांना २०१४ मध्ये महापौरपदाची संधी दिली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक अशा जबाबदाऱ्यांनी त्यांनी दीर्घकाळ सांभाळल्या. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे ते माजी जिल्हाध्यक्ष होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT