Daund News
Daund News Sarkarnama
पुणे

Daund News: राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांनी भाकरी फिरवली अन दौंड खरेदी-विक्री संघावर वर्चस्व कायम राखले

प्रफुल्ल भंडारी

दौंड (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी दौंड (Daund) तालुका सहकारी खरेदी विक्री संघावर निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. विशेष विद्यमान संचालक मंडळातील सर्वांना उमेदवारी नाकारूनही त्यांनी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणीत पॅनेलच्या १७ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. संघाच्या कारभाराविषयी तक्रारी वाढल्यानंतर विद्यमान संचालक एकाही संचालकाला त्यांनी पुन्हा संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. (Former MLA Ramesh Thorat dominated the Daund kharedi-vikri Sangh)

दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप समर्थकांनी प्रामुख्याने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु संघावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक तथा दौंड मतदारसंघाचे माजी आमदार रमेश थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने १७ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या. संस्था गटातील पिंपळगाव, वरवंड व पाटस गटातील तीन जागांसाठी निवडणूक होणार असून त्याकरिता सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी काहीसा अडचणीत असलेल्या संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची यंत्रणा बळकट असल्याने फारसे स्वारस्य दाखविले नाही.

संघाच्या सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात आले होते. सभेत रमेश थोरात यांनी या बाबत नाराजी व्यक्त करीत कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये तत्कालीन दोन चेअरमन, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने ४० लाख ८६ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लेखा परीक्षकांनी फिर्याद दिल्याने यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लेखा परीक्षणावर स्थगिती घेतलेली असताना गुन्हा दाखल करण्यात आल्याने संबंधितांनी हरकत घेतल्याने हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. संघाच्या कारभारामुळे सभासदांचे आर्थिक व पक्षाचे राजकीय नुकसान होत असल्याने यंदाच्या निवडणुकीत एकाही विद्यमान संचालकास पुन्हा संधी देण्यात आली नाही.

पक्षाचे धोरण व रमेश थोरात यांच्या सुचनेनुसार नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरल्यानंतर मावळत्या संचालक मंडळातील चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मावळत्या संचालकांसह ज्यांनी अर्ज मागे घेतले, त्यांना कुठलाही शब्द देण्यात आला नाही. परंतु संबंधितांनी विना तक्रार अर्ज मागे घेतले. त्यामुळे पक्ष पातळीवर थोरात यांचा शब्दच अंतिम असल्याचे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले. पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी देताना पक्षपातळीवर तालुक्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

दौंड खरेदी विक्री संघाचे बिनविरोध निवडून आलेले संचालक

संस्था गट : कासुर्डी- सदानंद वामन दोरगे, खामगाव- विजय पंढरीनाथ नागवडे, केडगाव- ज्ञानेश्वर साहेबराव शेळके, पारगाव- नानासाहेब गुलाबराव जेधे, नानगाव- विश्वास राजाराम भोसले, दौंड- जयवंत रामचंद्र गिरमकर, रावणगाव- गजानन नारायण गुणवरे. वैयक्तीक प्रतिनिधी गट : प्रेमनाथ बबनराव दिवेकर, पुरुषोत्तम बाळासाहेब हंबीर. महिला प्रतिनिधी : सविता अप्पासाहेब ताडगे, नंदा दत्तात्रेय ताकवणे. अनुसूचित जाती, जमातीतील प्रतिनिधी : विकास अनिल कांबळे, इतर मागास वर्ग प्रतिनिधी : संपत मारुती शेलार. विमुक्त जाती प्रतिनिधी : आश्रू सोमा डुबे.

संघाची वार्षिक उलाढाल १४ कोटी

दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ १४ मार्च १९६० मध्ये स्थापन झाला असून केडगाव (ता. दौंड) येथे मुख्यालय आहे. तालुक्यात संघाचे ११ खत डेपो, ०७ औषध विक्री दुकाने आणि ०९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. वार्षिक उलाढाल सरासरी १४ कोटी रुपये असून नफा सरासरी ६ ते १० लाख रूपये आहे. संघाचे चार स्वमालकीचे गोदाम असून अन्य गावांमध्ये भाडेतत्वावर गोदाम आहेत. केडगाव येथे व्यावसायिक गाळे आणि बीएसएनएलसाठी भाडेतत्वावर दिलेल्या जागेतून उत्पन्न मिळत आहे. संघाचा विस्तार करण्यासह उर्जितावस्था आणण्यास भरपूर वाव असून नवीन संचालक मंडळाकडून सभासदांच्या व पर्यायाने शेतकऱ्यांचा अपेक्षा मोठ्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT