Vilas Lande-
Vilas Lande- Sarkarnama
पुणे

मामा आणि भाचेजावयांमध्ये पुन्हा रंगणार सामना

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरूनही शहरात गेली वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भ्रष्टाचारात व्यस्त असणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नियोजनाअभावी तो जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. अशाप्रकारे वेठीस धरणाऱ्यांना जनता आगामी महापालिका निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी (ता. २७ सप्टेंबर) देत सहा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले (Former MLA Vilas Lande criticizes MLA Mahesh Landge over water supply)

पवना धरण भरल्याने साडेपाच हजार क्युसेस या वेगाने पाणी नुकतेच (ता. २१ सप्टेंबर) पवना नदीपात्रात सोडण्यात आले. याचा अर्थ धरणात पुरेसा पाणी साठा आहे. तरीही शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा नियमित करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना मुबलक पाणी न मिळाल्याने त्यांची अडचण होत आहे. चाकरमान्यांचे, गृहिणींचे हाल होत असून ते संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे, असे लांडे म्हणाले.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पाणीपुरवठा मुबलक व पुरेसा केला जात होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र,सध्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. राष्ट्रवादीने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी करूनही गेंड्याच्या कातडीच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने याबाबत कसलेही नियोजन केले नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी २७.७० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र, जमिनी ताब्यात घेणे, शासकीय स्तरावर परवानगी आदींसह इतर अडीअडचणी सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. केवळ ऑनफिल्डचा दिखावा करण्याऐवजी प्रत्यक्ष हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांची तहान भागवावी, असा टोला त्यांनी नाव न घेता शहराचे कारभारी तथा भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना लगावला. कारण नुकतीच त्यांनी या योजनेची चिखली येथे ऑनफिल्ड पाहणी करून लवकरच शहरवासियांना दररोज व पुरेसे पाणी मिळेल, असे सांगितले होते.

दरम्यान, या मामा आणि भाचेजावयांमध्ये पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सामना रंगणार असल्याचे संकेतच याद्वारे मिळाले आहेत. आता हा प्रकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकाळातच पूर्ण होईल. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेच त्याचे उद्‌घाटन होईल, असेही लांडे यांनी म्हणत भाजप कारभारी लांडगे यांना आणखी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT