<div class="paragraphs"><p>NCP leaders PCMC</p></div>

NCP leaders PCMC

 

sarkarnama

पुणे

भोसरीच्या मैदानात आधी भाजपची अन् आता राष्ट्रवादीची हवा...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महिनाभर विविध दीडशे कार्यक्रम गेल्या महिन्यात घेऊन पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) भाजपचे अध्यक्ष व भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीची तयारीही त्यातून केली गेली. या सोहळ्याची सांगता 'चला, हवा येऊ द्या'ने करून मोठी हवा भोसरीच्या गावजत्रा मैदानात भाजपने केली. तशीच हवा राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याच ठिकाणी तोच कार्यक्रम (चला, हवा...) घेऊन गुरुवारी (ता.२३) केली.

या वेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजप व लांडगेंवर नाव न घेता माजी आमदार विलास लांडेंनी (Vilas Lande) हल्लाबोल केला. करदात्यांच्या खिशात हात घालून पैसे खाणाऱ्या सत्ताधारी भाजप या भस्मासुराची आगामी पालिका निवडणुकीत हवा घालवा. या भ्रष्टाचारी भस्मासूराच्या तावडीतून शहर वाचवायचे असेल, तर राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपने शहराची गेल्या पाच वर्षात दुर्दशा केली. ते भ्रष्टाचार करून पैसे खात आहेत. लोकांना फसवून पैसे खात आहेत. किती खावे याचे भान देखील त्यांना नाही. हा भस्मासुर आपल्या खिशात हात घालून पैसे खाण्याचे काम करत आहे, अशी कडवट टीका लांडे यांनी केली. मात्र, त्यांची भष्ट्राचाराची ही नस आता शहरातील नागरिकांनी ओळखली आहे, असे ते म्हणाले. आमच्या विरोधकांनी काही दिवस हवा केली. आता त्यांची हवा काढायची आहे, असा लांडगेंचा नामोल्लेख टाळत त्यांना लांडे यांनी जोरदार लक्ष्य केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'चला हवा येऊ द्या', या मनोरंजनाच्या कार्यक्रमापूर्वी ते बोलत होते.

पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी महापौर योगेश बहल, मोहिनी लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, विक्रांत लांडे, नाना काटे, रवी लांडगे, योगेश गवळी, वैशाली घोडेकर,अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, विराज लांडे, संजय उदावंत, विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते. त्यातही भाजप नगरसेवक रवी लांडगेंची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. यानिमित्ताने शहर राष्ट्रवादी बऱ्यापैकी एकवटलेली प्रथमच पहायला मिळाली.

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुल राष्ट्रवादीच्या पालिकेतील सत्ताकाळात ९० कोटी रुपये खर्चूनबांधला. आता त्या पूलाखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली ३८ कोटी रुपये खर्च करण्याचा दिखावा भाजप करत आहेत. एवढी मोठी रक्कम खर्चून त्या ठिकाणी ते काय सोने बसविणार आहेत का? अशी विचारणा लांडे यांनी केली. भाजपने काय मोठे काम केले ते दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शरद पवारांनी उद्घाटन केलेल्या भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राची परिस्थिती सध्या काय आहे. निधी किती मंजूर होता, वाढीव किती दिला? किती काम भाजपने केले हे निवडणुकीनिमित्त जनतेपुढे ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला म्हणून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली, असे सांगत त्यांनी त्याचे श्रेय घेणाऱ्या लांडगेंना पुन्हा नाव न घेता लक्ष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT