Baba Chormale Sarkarnama
पुणे

Baramati News : पळशीच्या माजी सरपंचांची बातच न्यारी : वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा देत बारावीत पटकावला प्रथम क्रमांक

विशेष म्हणजे २३ वर्षांपूर्वी त्यांनी इयत्ता दहावीतही प्रथम क्रमांक पटकावला होता.

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : शिक्षण ही निरंतर चालणारी गोष्ट आहे, त्यामुळे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते तुम्हाला घेता येते. बारामती (Baramati) तालुक्यातील पळशी गावच्या माजी सरपंचाने वयाच्या ४० व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आणि परीक्षेत तब्बल ८८ टक्के गुण मिळवित महाविद्यालयात प्रथम क्रमांकावर बाजी मारली. विशेष म्हणजे २३ वर्षांपूर्वी त्यांनी इयत्ता दहावीतही प्रथम क्रमांक पटकावला होता. (Former sarpanch of Palashi took the exam after 23 years and got first rank in twelfth)

बाबा रामा चोरमले असे बारावीत घवघवयीत यश मिळविणाऱ्या पळशीच्या माजी सरपंचांचे (Sarpanch) नाव आहे. ते सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. पळशीतील शाळेत त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना लोणी भापकर येथील न्यू इंग्लिश स्कूलला जावे लागले. त्या ठिकाणी त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी २००० मध्ये दहावीत ७८.५३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी पुढे शिक्षणच केले नाही.

शिक्षण थांबल्यानंतर त्यांना राजकारणाची गोडी लागली. त्यातून ते २००७ मध्ये ग्रामपंचायत सदस्य झाले. त्याच पंचवार्षिकमध्ये २०१० मध्ये ते उपसरपंचही बनले. उपसरपंचपदी गेल्यावर शिक्षण राहून गेल्याची हुरहूर लागली. त्यामुळे ११ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा सोमेश्वर डिप्लोमा कॉलेजला प्रवेश घेतला. पुढे २०१७ पर्यंत डिस्टींक्शनमधे डिग्री पूर्ण केली. पुन्हा गावकऱ्यांच्या आग्रहावरून थेट जनतेतून सरपंचपदासाठी निवडले गेले आणि २०२२ पर्यंत त्यांनी गावचे सरपंचपद सांभाळले.

सरपंचपदावरून पायउतार झाल्यावर स्वयंरोजगार सुरू केला. मात्र बारावी राहून गेल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमधून सतरा नंबरचा फॉर्म भरण्याचे ठरविले. बारावीची परीक्षा दिला. विशेष म्हणजे तब्बल २३ वर्षांनंतर अभ्यास करत त्यांनी मराठी ८९, इंग्रजी ८०, हिंदू ९०, इतिहास ९२, भूगोल ८७, राज्यशास्त्र ९० असे गुण मिळवून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी वीस टक्क्यांनी त्यांच्या मागे आहे! या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सचिव बाळकृष्ण भापकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

२३ वर्षांनी माझ्याच शाळेत पहिला आलो, याचे समाधान

या यशाबद्दल बाबा चोरमले म्हणाले की, बारावी राहिली, अशी सल मनात होती. अभ्यासाला वेळ मिळेल का, पास होऊ का असे प्रश्न घेऊन मुख्याध्यापक संदीप जगतापांना भेटलो. त्यांनी तेव्हाच 'दहावीप्रमाणेच टॉप कराल' असा विश्वास दिला होता आणि तसेच झालेसुद्धा. कृतीयुक्त पध्दतीमुळे भाषा विषय कमी अभ्यासावर तरले अन्य विषयांसाठी युट्यूबच्या लेक्चरचा फायदा झाला. तेवीस वर्षांनी माझ्याच शाळेत पहिला आलो, याचे समाधान वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT