Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या कारनं पुण्यात एका रिक्षाला जोरदार धडक दिल्यानं यात रिक्षाचालक जखमी झाला आहे. तर त्याच्या रिक्षाचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर चालक फरार झाला होता, पण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं काही तासांतच त्याच्या मुसक्या आवळल्या. पण अपघातावेळी कारमध्ये गौतमी पाटील उपस्थित होती का? हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेला आहे.
यावर अद्याप गौतमीचं स्पष्टीकरण आलेलं नाही. पण ज्यांनी हा अपघात पाहिलेला नाही त्यांनी मात्र यावरुन आरोपप्रत्यारोपांची राळ उडवून दिली आहे. कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या फोननंतर पोलिसांनी देखील गौतमीला नोटीस पाठवली आहे. पण याबाबत रिक्षा चालकाच्या मुलीनं गौतमीवर आरोप केले आहेत, त्यामुळं तिच्या बाजूनं बोलणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या विधानातली हवाच तिनं काढून घेतली आहे.
गौतमी पाटीलच्या कारला झालेल्या अपघाताच्या तपासाला वेग आला असताना आता जखमी रिक्षाचालकाच्या मुलीने यासंदर्भात एक दावा केला आहे. अपघातावेळी गाडीत गौतमी देखील होती असा माझा संशय आहे, असं रिक्षाचालकाच्या मुलीनं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. माझा संशय गौतमी मॅडमवर आहे, असं मुलीचं म्हणणं आहे. पण तिच्या या विधानामुळं रोहित पवारांनी गौतमीच्या अनुपस्थितीबाबत केलेल्या दाव्यातील हवाच निघाली आहे.
पुण्यातील या अपघात प्रकरणात गौतमी पाटीलवर कारवाई करा यासाठी पोलिमांना फोन करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांना उत्तर देण्यासाठी रोहित पवारांनी ट्विट केलं. यात ते म्हणतात....
माननीय चंद्रकांतदादा पाटील,
तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!
आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?
चंद्रकांत पाटील या प्रकरणी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन केला आणि म्हणाले, गौतमी पाटीलला उचलायचं की नाही. ज्याच्या गाडीनं अपघात झाला आहे त्याच्यावर कारवाई करायची की नाही. गौतमी पाटील जर कारमध्ये नव्हती तर जो कोणी कार चालवत होता त्याला पकडायला हवं. पण पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्याचं सांगितल्यानंतर त्याच्यावर आता गुन्हा दाखल करा, गाडी जप्त करा आणि गौतमी पाटीलला नोटीस द्या तसंच जखमी रिक्षा चालकाला खर्च द्यायला सांगा असा आदेश यावेळी आमदारांनी डीसीपींना दिला.
मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या भरधाव वेगात असलेल्या कारनं रिक्षाला धडक दिली होती. तसंच रिक्षाचालक समाजी मरगळे हे जखमी झाले. इतकंच नव्हे धडकेत रिक्षाचही मोठं नुकसान झालं होतं. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी रिक्षाचालकाला तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण कार गौतमी पाटीलची असल्यानं पोलीस या प्रकरणात योग्य ती कारवाई करत नाहीएत, असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केला होता. तसंच गौतमीनं आमच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणीही या कुटुंबानं केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.