girish bapat sarkarnama
पुणे

Girish Bapat: डिस्चार्ज मिळताच खासदार बापटांनी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गाठला थेट कट्टा...

Pune News: गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Girish Bapat News : भाजप खासदार गिरीश बापट यांच्यावर मागील काही महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, खासदार बापट हे आजारी पडल्यानंतर मंगळवारी ( दि.१८) पहिल्यांदाच सुमारे दीड महिन्यानंतर अचानक कसबा कार्यालयात दाखल झाले अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

खासदार गिरीश बापटांना (Girish Bapat) तब्येतीत सुधारणा झाल्यानं रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजारातून थोडं बरं वाटल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघातील कसबा कार्यालय काल (ता.17 जानेवारी) गाठलं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. बापट कसबा कार्यालयात पोहोचल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजताच बघता बघता कार्यालय परिसरात हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

खासदार बापट हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना श्वसनाचा त्रास आहे. ते आजारी असल्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि महिन्याभरात संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू अशा शब्दांत पवार यांनी बापट यांना धीर दिला होता.

बापट यांची पुण्याच्या राजकारणावर मोठी छाप असून त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून दीर्घकाळ आमदार म्हणून काम केलं आहे. तर आता खासदार म्हणून कार्यरत आहेत.

खासदार बापट हे आजारी पडल्यानंतर काल पहिल्यांदाच सुमारे दीड महिन्यानंतर कसबा कार्यालयात दाखल झाले होते. ते कार्यालयात येणार याची कुणालाच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे जसे कार्यालयात यायचे आणि ज्या ठिकाणी बसायचे तिथे येऊन बसले होते. दरम्यान, अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. ही बातमी लगेच कार्यकर्त्यांपर्यंत पोचली आणि कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली.

त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र अजूनही ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली आहे. असे असूनही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं आणि भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT