Maharashtra Politics : 'गोकुळ' कोणाचे? हे दूध उत्पादक सभासदांनी ठरवले असताना, राज्यातील भाजप महायुती सरकारने चार तज्ज्ञ संचालकाची नियुक्ती करून, अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पारडे जड करून ठेवले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात राजर्षी शाहू समविचारी आघाडी आणि काँग्रेसने संघर्ष पुकारला आहे. कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चातून लढा तीव्र केला असतानाच, विरोधकांनी देखील भाजपच्या या खेळीवर जोरदार टीका सुरू केली आहे.
महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या प्रवृतीवर हल्ला चढवला आहे. यासाठी पुणे महापालिकेतील 2017चा किस्सा सांगत, भाजप पराभूत उमेदवारांना कसे सत्तेजवळ आणते, याची पोलखोल केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा जोरदार फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावरून थेट शिवसेनेचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले. पुण्याचे शिवसेनेचे स्थानिक नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी, भाजपवर उलटवार करत, जोरदार प्रत्युत्तर दिले.
महायुतीत भाजप (BJP)-एकनाथ शिंदे शिवसेनेत आलबेल नाही, असे समोर आहे. या दोन्ही मित्रपक्षांतील वाद, पुढे धंगेकर आणि बन यांच्यात व्यक्तिगत पातळीवर पोहोचला. महायुतीत असून दोन्ही मित्रपक्षात अंतर्गत जोरदार धुसफूस सुरू आहे. यातच कोल्हापुरच्या गोकुळमध्ये राजर्षी शाहू समविचारी आघाडीला 13 आणि महायुतीला 12जागा मिळाल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने गोकुळची सत्ता खेचून आणण्यासाठी तज्ज्ञ संचालक नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर घेत आदेश काढला.
महायुती सरकारच्या या खेळीविरोधात कोल्हापुरातील राजर्षी शाहू समविचारी आघाडी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संघर्ष उभा केला आहे. तसेच न्यायालयीन लढाई देखील पुकारली आहे. हा संघर्ष सुरू असतानाच, महायुतीमधील भाजपचा मित्रपक्ष एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेतील 2017 चा किस्सा सांगून भाजपला डिवचले आहे.
रवींद्र धंगेकर यांनी, गोकुळमध्ये आज जे घडत आहे, तो भाजपच्या राजकारणाचा नवा प्रकार नाही; 2017 मध्ये पुणे महापालिकेत असाच प्रकार घडला होता! गोकुळमध्ये भाजपकडून सुरू असलेले राजकारण पाहता 2017मधील पुणे महानगरपालिका निवडणुकीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असे म्हटले आहे.
2017 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे जवळपास 100 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्याच निवडणुकीत मी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. त्यानंतरही पराभूत उमेदवाराला सभागृह नेते पदावर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सभागृहाचे नेतृत्व पराभूत उमेदवाराकडे सोपवण्याचा हा प्रकार लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. या निर्णयाविरोधात न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अखेर न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला, अशी आठवण रवींद्र धंगेकर यांनी करून दिली.
गोकुळमध्ये आजही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र दिसत आहे. मित्रपक्ष असला तरी केवळ सत्तेच्या हव्यासापोटी, अशा प्रकारची राजकीय समीकरणे आणि डावपेच रचणे योग्य नाही. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल, निवडणुकीतून मिळालेला जनादेश आणि संस्थात्मक नियम यांना सर्वोच्च स्थान असले पाहिजे, असा सल्ला देखील धंगेकर यांनी भाजपला दिला आहे. सत्तेसाठी नियम आणि लोकशाही संकेत बाजूला ठेवण्याची प्रवृत्ती कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही. राजकारणात सत्ता महत्त्वाची असू शकते; पण लोकशाहीची मूल्ये आणि जनादेश त्याहूनही महत्त्वाचे आहेत! असेही धंगेकर यांनी पुढे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.