Pune Airport  Sarkarnama
पुणे

International flights to Bangkok, Dubai: पुणेकरांसाठी गुड न्यूज! बँकॉक, दुबईसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे; 'या' तारखेपासून होणार सेवा सुरु

Sachin Waghmare

Pune News : पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्याने आता यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होणार आहे. यात पुणे ते बँकॉक, पुणे ते दुबई या विमानसेवेचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या 27 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु होत आहेत. यामध्ये पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बॅंकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. ही सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्विट करून दिली आहे. (International flights to Bangkok, Dubai )

या पूर्वी पुणे ते बँकॉक दरम्यान पूर्वी विमानसेवा सुरू होती. मात्र कोविडच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी बँकॉकची सेवादेखील बंद झाली. ती अद्याप सुरू झालेली नव्हती. ही सेवा आता सुरु करण्यात आली आहे.

तिसरा देश पुण्याला जोडला जाणार

पुणे विमानतळावरून दोन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू आहेत. यात दुबई व सिंगापूरचा समावेश आहे. बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाल्यावर पुण्याहून थायलंड हा देश जोडला जाईल. यानिमित्ताने तिसरा देश पुण्याला जोडला जाईल. यामुळे पुण्याची कनेकटव्हीटी वाढण्यास मदत होईल.

पुणे विमानतळावरून दररोज 95 विमानांचे उड्डाण

तीन महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पुण्यातील विमानतळावरून दररोज 95 विमानांचे उड्डाण होत आहेत. त्यासोबतच मोहोळ यांनी पदभार हाती घेतल्यानंतर लगेचच विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्यावर भर दिला होता. हे काम पूर्ण झाल्याने आता पुण्याहून दोन्ही टर्मिनल मिळून सध्या सुमारे 190 विमानांची वाहतूक होत आहे.

दैनंदिन 35 हजार जण करतात प्रवास

पुणे विमानतळावरून दैनंदिन सरासरी 95 विमानांचे उड्डाण व 95 विमानांचे लँडिंग होत आहे. विमानसेवा वाढल्याने सध्या प्रवासी संख्या वाढली आहे. सरासरी 35 हजारहुन अधिक प्रवासी दैनंदिन प्रवास करीत आहेत.

पुण्यातील नव्या टर्मिनल मुळे वर्षाला सुमारे 90 लाख ते 1 कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक करणे शक्य होणार आहे. जुन्या टर्मिनलमधील सर्व सेवा लवकरच नव्या टर्मिनलमधून उपलब्ध करून दिल्या आहेत.

दरम्यान, पुण्यातील विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत अपुरे पडणारे जुने टर्मिनल लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर या नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली. पुण्याची संस्कृती आणि समृध्द परंपरा यांचे दर्शन या वास्तुमधून घडेल, अशा पद्धतीने ते सजवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने 10 मार्च 24 रोजी या टर्मिनलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून 14 जुलैला हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या मार्गदर्शनात साकार होणाऱ्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे देशाल जगातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनवण्याच्यादृष्टीने नवीन विमानतळे, नवे हवाई रस्ते निर्माण करण्याचे आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा शाश्‍वत विकास करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT