Missing Link-Gopichand Padalkar Sarkarnama
पुणे

Gopichand Padalkar : ‘मिसिंग लिंक’ला शिंग्रोबांचे नाव देण्यासाठी पडळकरांची 7 महिन्यांपासून फिल्डिंग; स्वतःसह 6 आमदारांची पत्र दिली मुख्यमंत्र्यांना!

Missing Link Naming Issue : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी त्याला शिंग्रोबा धनगरांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 03 May : पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावरील घाटातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञनाच्या साहाय्याने ‘मिसिंग लिंक’ उभारला आहे. त्याचे एक मे रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात उद्‌घाटन करण्यात आले. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘मिसिंग लिंक’ न म्हणता ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधण्याची सूचना केली आहे. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या सात महिन्यांपासून मिसिंग लिंकला शिंग्रोबा धनगरांचे नाव देण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

पुण्यातील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी ‘मिसिंग लिंक’च्या नामकरणासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, मागच्या सात ते आठ महिन्यांपूर्वी त्या भागातील कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेश बाल्दी यांची आणि माझं पत्रं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिसिंग लिंकच्या नामकरणाबाबत दिली आहेत.

महाराष्ट्रातील केवळ धनगर समाजाच्या (Dhangar) नाही, तर संपूर्ण राज्यासह आणि त्या परिसरातील लोकांची भावना आहे की, मुंबई ही देशाला जोडण्याचे काम शिंग्रोबा धनगर यांनी केलेले आहे. ते देशासाठी बलिदान देणारे पहिले आहेत, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, पुण्याहून मुंबईला जाण्यासाठीचा रस्ता दाखवल्यानंतर इंग्रजांनी शिंग्रोबा धनगर यांना ‘तुला बक्षीस काय हवंय,’ असं विचारलं. त्या वेळी शिंग्रोबा धनगर यांनी ‘मला बक्षीस नको, पण तुम्ही आमचा देश सोडून जावा, आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या,’ अशी मागणी केली.

देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या शिंग्रोबा धनगर यांना त्यावेळी इंग्रजांनी गोळ्या घातल्या, त्यामुळे स्वाभाविक आहे की, या ‘मिसिंग लिंक’ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची सर्वांचीच मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधावे असे म्हटले आहे, त्यामुळे या ‘कनेक्टिंग लिंक’ला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर असं नाव द्यावं, अशी मागणी केली आहे.

'कनेक्टिंग लिंक'ला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी येत्या मंगळवारी (ता. ५ मे) आम्ही पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत, असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT