Pimpri police  Sarkarnama
पुणे

Pimpri Police News : राज्यपाल रमेश बैस यांच्या दौऱ्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पुन्हा नजरकैदेत ; विरोध नसतानाही कारवाई...

सरकारनामा ब्यूरो

Pimpri : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या १४ व्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी आज (ता.१४) पिंपरीत आले होते. त्यांच्या या दौऱ्याला कसलाच विरोध नसलेल्या सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतल्याने त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. आठ दिवसांपूर्वीच (ता.६) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या शहर दौऱ्यातही पोलिसांनी या व इतरही अनेक कार्यकर्त्यांना काही तास स्थानबद्ध केले होते.

शाहांचा दौरा सुरु होण्याअगोदरच शहरातील सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावून त्यातील काहींना त्यांच्या घरी सकाळीच स्थानबद्ध केले. तर,काहींना पोलिस ठाण्यावर बोलावून शाह जाईपर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवले होते.

शाहांच्या दौऱ्याला विरोध नसतानाही ही कारवाई केल्याबद्दल ही कारवाई झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी ही अघोषित आणीबाणी असल्याचा संताप त्यावेळी व्यक्त केला होता. तसाच त्रागा त्यांनी आज पुन्हा पोलिसांनी डिटेन करताच केला. आपली लोकशाही कुठल्या दिशेने चालली आहे, अशी संतप्त विचारणा त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कारवाईवर केली. १९७७ ची घोषीत आणीबाणी होती,पण सध्यात देशात ती अघोषितपणे सुरु आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

आजही सकाळी भापकरांची अंघोळ होण्यापूर्वीच पिंपरी पोलिसांचा ताफा मोहनगर येथील त्यांच्या घरी गेला. त्यांना स्थानबद्ध केले. नंतर पिंपरी पोलिस ठाण्यात आणले. `आरपीआय`चे (आठवले गट) शहर सरचिटणीस बाळासाहेब रोकडे, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवेंद्र तायडे,भीमशक्ती युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे यांनाही तोपर्यंत ठाण्यात बोलावून नजरकैद करण्यात आले होते.

यापूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांबद्दल वारंवार अवमानकारक विधाने करीत असल्याने त्यांच्याबद्दल रोष होता. पण, बैस हे नवे राज्यपाल असल्याने त्यांना व त्यांच्या या दौऱ्याला कसलाही विरोध केला नसतानाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल वरील चारही जणांनी मोठा संताप व्यक्त केला.केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT